काणकोण : विठू सुकडकर
राज्य सरकारने वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन नियोजनबद्धरीत्या तिसऱ्या जिल्ह्याची आखणी केली आहे. काणकोण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काणकोण तालुक्याचा तिसऱ्या जिल्ह्यात सामावेश करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे.
विरोधकांनी विरोध म्हणून विनाकारण तिसऱ्या जिल्ह्याला विरोध करू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काणकोण येथील आदर्श ग्राम, श्री बलराम शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी आदी लोकोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राज्यात काणकोणसह सांगे, केपे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचा कुशावती हा नवीन तिसरा जिल्हा तयार होणार आहे. त्या जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून वेगळा निधी प्राप्त होणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर मुख्यालय मिळणार असून प्रशासनात वेगळा जिल्हाधिकारी मिळणार आहे. सध्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जिल्ह्यांना मिळत असलेली साधन सुविधा व सोयी उपलब्ध होणार आहेत.
नवीन जिल्ह्याला खास निधी मिळणार असल्याने नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासोबत जिल्हा प्रशासन, नवीन जिल्हा इस्पितळ, नवीन पोलिस उपमुख्यालय या सुविधा तिसऱ्या जिल्ह्यातील लोकांना मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा गतिमान विकास होणार आहे. रस्त्यांचे रुंदीकरणासह नवीन रस्ते तयार होतील. त्यासोबतच नवीन जिल्ह्याचा जलदगतीने भौतिक विकास होणार आहे.
नवीन नोकरभरती होऊन रोजगारही निर्माण होणार आहे. सरकारने काणकोण तालुक्याच्या विकासासाठी काणकोण तालुक्याचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेश केला आहे. काणकोण तालुक्याचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेशाला विरोधक विरोध करतात म्हणून काणकोणमधील सुशिक्षित लोक व सामान्य लोकांनी विरोध करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.