Tarun Tejpal sexual assault case
पणजी : २०१३ मधील गोव्यातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने माजी तेहलका संपादक तरुण तेजपाल यांना दोषी ठरवत सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करून दणका दिला आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात राज्य सरकारच्या अपीलाला यश मिळाले आहे.
हे प्रकरण नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात आयोजित थिंकफेस्ट कार्यक्रमादरम्यान घडल्याचा आरोप आहे. त्यावेळी तेजपाल यांनी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर हॉटेलच्या लिफ्टमध्ये दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मे २०२१ मध्ये म्हापसा येथील सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती.
मात्र, त्या निकालाविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सत्र न्यायालयाने पीडितेच्या वर्तणुकीबाबत चुकीचे निकष लावल्याचा युक्तिवाद केला होता, तर बचाव पक्षाने आरोप फेटाळून लावले होते.
उच्च न्यायालयाने आता सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. शिक्षेबाबतचा पुढील आदेश न्यायालयाकडून दिला जाणार असून या निकालामुळे देशभर चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.