चावडी : पुढारी वृत्तसेवा
तळपण येथील सागर नमशीकर यांच्या मच्छीमारी बोटीवरील चारही मच्छीमार अंकोला येथे खोल समुद्रात सुखरूप असल्याची माहिती काणकोणचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दिली.
दरम्यान, बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्याच्या निषेर्धात तळपणवासीयांनी रास्ता रोको केला. सागर नमशीकर यांची मच्छीमारी बोट मच्छीमारी करून तळपण जेटीवर पहाटे ३ वा. पोहोचणार असा संदेश मच्छीमारांनी बोट मालक सागर नमशीकर यांना दिला असता ते पहाटे ५ वाजले तरी बोट जेटीवर न पोहोचल्याने त्यांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अखेर सागर नमशीकर व इतर मच्छीमार दुसऱ्या एका बोटने समुद्रात गेले व त्यानी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेच दिसले नाहीत, त्यानंतर या घटनेची माहिती तटरक्षक दल व पोलिसांना देण्यात आली. काणकोण पोलिस व तटरक्षक दल हेलीकॉप्टरच्या सहाय्याने बेपत्ता बोट व मच्छीमारांचा शोध घेत होते. या बोटीवर मोठ्या प्रमाणात जाळ्यात पकडून आणलेले इसवण होते.
तळपण येथे रास्ता रोको केल्यानंतर काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई, उपअधीक्षक नीलेश राणे, वाहतुक निरीक्षक गौतम साळुंखे पोलिस फ़ौज फाट्यासह तळपण येथे पोहोचले. त्यांनी रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. परंतु आंदोलनकर्ते रास्ता रोको मागे घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
शेवटी उपअधीक्षक राणे यानी मध्यस्थी करुन रास्ता रोको मागे घेतला. त्याच वेळेत कोस्टल पोलिस स्थानकाचे निरीक्षक जे समुद्रात बेपत्ता बोटीच्या शोधार्थ गेले होते. त्यांनी बेपत्ता झालेले संदीप आरोंदेकर, चेतन आरोंदेकर, अनिकेत गोवेकर, अॅन्थनी जुवाँव बापिस्ता रिबेलो हे मच्छीमार अंकोला येथील खोल समुद्रात सुखरूप असल्याची माहिती आंदोलकांना दिली.