पणजी : पुढारी वृत्तसेवा
ताळगाव ब्लॉक काँग्रेस समितीने भाजपचे माजी प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक आणि सीसीपीचे माजी नगरसेवक शीतल नाईक यांच्या काँग्रेसमधील प्रस्तावित प्रवेशाला तीव्र विरोध केला. प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल आणि ताळगाव व पणजीमधील पक्षाच्या शक्यतांना धक्का बसेल, असा इशाराही समितीने दिला.
एका शिष्टमंडळाने काँग्रेस हाऊस येथे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि कार्याध्यक्ष एम. के. शेख यांची भेट घेतली आणि समितीने मंजूर केलेले ठराव सादर केले. यावेळी समर्पित आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी समितीने असा आरोप केला आहे की, नाईक दाम्पत्याने गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी सक्रियपणे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत 'आप'ला पाठिंबा दिला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिला. नाईक यांनी पूर्वी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेतृत्वावर जाहीरपणे टीका केली होती, असेही यावेळी सांगण्यात आले.
माझी राजकीय वाटचाल मतदार ठरवतील : दत्तप्रसाद नाईक
माझी राजकीय वाटचाल ताळगावचे मतदार ठरविणार आहेत, असे विधान भाजपचे माजी प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांनी केले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाईक म्हणाले की, मी काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज यांना २०२२ मध्ये पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी मी भाजपचा राजीनामा दिला होता. भाजपचा प्रवक्ता या नात्याने काँग्रेसविरोधात बोलायचे ते मी बोललो. माझे २५ वर्षे काँग्रेसशी चांगले संबंध आहेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात मला पहिल्यापासून मार्गदर्शन मिळते आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही मार्गदर्शन करतात. गेले दोन महिने मी ताळगाव मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात असून मतदार जे सांगतील त्याप्रमाणे मी करणार आहे, असेही नाईक म्हणाले. नाईक म्हणाले की, जर काँग्रेसने माझ्यापेक्षा चांगला उमेदवार उभा केला, तर मी त्या उमेदवाराला मनापासून पाठिंबा देईन. पणजी आणि ताळगाव मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होईल. इतर छोट्या राजकीय पक्षांनी आपला उमेदवार इथे उभा करू नये. कारण ही लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. पणजीच्या मतदारांनी उत्पल पर्रीकर यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही नाईक यांनी केले. ताळगाव ब्लॉक समितीकडून काँग्रेसमध्ये नाईक व त्यांच्या पत्नीला प्रवेश देण्याच्या विरोधावर नाईक म्हणाले की, ती काँग्रेसची अंतर्गत बाब असून ती पक्षाने सोडविली पाहिजे