नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपत्कालीन परिस्थितीत फिर्यादी मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात. नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता चोवीस तास उघडे राहतील, अशी माहिती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गुड न्यूज दिली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या नागरिकाला कायदेशीर आणीबाणीचा सामना करावा लागला किंवा तपास यंत्रणांकडून अवेळी अटकेची धमकी दिली गेली, तर ती व्यक्ती आपल्या मूलभूत अधिकारांच्या आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मध्यरात्रीही घटनात्मक न्यायालयांकडे सुनावणीची मागणी करू शकेल.
माझा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना जनतेची न्यायालये बनवण्याचा आहे, जेणेकरून कायदेशीर आणीबाणीच्या वेळी कोणत्याही क्षणी न्यायालयाशी संपर्क साधता येईल.
प्रलंबित प्रकरणांसाठी घटनापीठांची स्थापना
सरन्यायाधीशांनी त्यांच्या कामाच्या प्राधान्यक्रमांबाबतही माहिती दिली. अनेक महत्त्वाच्या घटनात्मक मुद्द्यांशी संबंधित प्रलंबित याचिकांचा निकाल लावण्यासाठी जास्तीत जास्त घटनापीठांची स्थापना करणे ही त्यांची प्राथमिकता असेल.
यामध्ये त्यांनी निवडणूक यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांचे उदाहरण दिले, जे प्रकरण बिहारमधून सुरू होऊन आता डझनभर राज्यांमध्ये प्रलंबित आहे.