डिचोली: डिचोली येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणार्या विद्यार्थिनीवर बळजबरी करून तिचा लैंगिक छळ व नंतर मारहाण केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी पडोसे पर्ये सत्तरी येथील गौरीश बारकेलो गावकर (वय 19) या युवकास अटक केली आहे. ही घटना गेल्या 14 ऑक्टोबर रोजी दुपारी वाठादेव सर्वण डिचोली येथे एका निर्जनस्थळी असलेल्या मंदिराच्या ठिकाणी घडली होती.
या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर जलदगतीने चौकशी हाती घेऊन डिचोली पोलिसांनी सदर युवकास अटक अटक केली. या प्रकरणी संबंधित पीडित मुलीच्या भावाने डिचोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. काळ्या रंगाच्या स्कूटरवरून संशयित गौरीश गावकर याने सदर अल्पवयीन विद्यार्थिनीला वाठादेव सर्वण येथे एका निर्जनस्थळी असलेल्या मंदिराजवळ नेले होते. तेथे तिच्यावर बळजबरी करून नंतर तिला अमानुष मारहाण केली.
तिच्या तोंडावर मुक्के मारून तिचे दात तोडले. तोंडाला गंभीर जखम केली. तसेच तिचे तोंड जमिनीवरील आदळले. या प्रकरणाचा व्हिडिओ त्या युवकाने आपल्याच मोबाईलवर चित्रित केला होता. तसेच त्या मुलाने पालकांना व इतरांना हे प्रकरण सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
त्यामुळे ती मुलगी व तिचे पालकही गप्पच होते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये ती मुलगी पायर्यांवर पडलेल्या अवस्थेत तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत होते. या प्रकरणी वेगवेगळे तर्क वितर्क लढविण्यात येत होते.
मुलीला मारहाण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. याची डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी गंभीर दखल घेत संशयित युवकाचा शोध घेतला. तिच्याकडे व पालकांकडे संपूर्ण चौकशी केली. गौरीश गावकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला व जलद गतीने चौकशी करत मुलाला ताब्यात घेतले व अटक केली.
या मुलाच्या विरोधात बालहक्क कायदा तसेच पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता सदर युवकाने अनेकदा बळजबरी करून त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित तरुणाने वापरलेली काळ्या रंगाची स्कूटर पोलिसांनी जप्त केली आहे.