ST bus brake failure Parvari accident
पणजी : तासगावहून पणजीला येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने पर्वरी येथील पुंडलिक नगर जवळच्या सिग्नल जंक्शनवर अपघात झाला. सिग्नल बंद असल्याने वाहतूक पोलिसांनी थांबण्याची सूचना केल्यावर चालकाने ब्रेक दाबला असता बसचे ब्रेक लागले नाहीत.
ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान राखले आणि गाडी डाव्या बाजूला वळविली. कठडे आणि झाडेझुडपे याला अडकून बस थांबेल, असे त्यांना वाटले. सुदैवाने बस थोडी पुढे जाऊन झाडांत अडकून थांबली. या बसचे चालक वाहक (ड्रायव्हर कंडक्टर) नियमित येणारे असल्याने त्यांना पुढे सिग्नल आहे हे माहीत होते.
त्यामुळे चालक बस हळू चालवत होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बेती येथे महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे बस स्थानक आहे. तिथे बस थांबणार होती. मात्र, अगोदर दोन ते तीन कि. मी.वर बसचा अपघात झाला. बसमध्ये २०-२२ प्रवासी होते, अशी माहिती वाहक नलावडे यांनी दिली. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याचे चालकाने सांगितले.
मोठा अनर्थ टळला...
या सिग्नलच्या पुढे दुसरा एक सिग्नल आहे. तसेच दोन मांडवी पूल आहेत. ते वगळून उजव्या बाजूने बस तीव्र उतारावरून बसस्थानकाकडे जाते. अपघातस्थळापासून पुढे सगळा उतारच आहे. शिवाय या भागात वाहतूक खूप असते. ते वगळून बस अजून पुढे या उतारावर येऊन मग ब्रेक फेल झाले असते, तर बसमुळे अनेक वाहने अपघातग्रस्त झाली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती.