सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांनी २८ सप्टेंबर ते ४ अक्टूबर २०२६ या आठवडाभरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ६२ चालकांविरोधात कारवाई केली. मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात दररोज सरासरी नऊ प्रकरणांची नोंद झाली.
या कारवाईत फोंडा वाहतूक खात्यात सर्वाधिक १८ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याखालोखाल मडगावमध्ये ११, फातर्यात १०, केपे आणि काणकोण येथे प्रत्येकी सहा, कोलवा येथे पाच, कुडचडे येथे चार, तर वास्को येथे दोन प्रकरणांची नोंद झाली.
दरम्यान, १ जानेवारी ते ३० जून २०२६ या पहिल्या सहा महिन्यात दक्षिण गोव्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याची ८१८ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्यावेळी काणकोण वाहतूक खाते १७४ प्रकरणांसह आघाडीवर होते.
मडगावमध्ये १४२, फोंड्यात १४१, वास्को येथे १३३, डिचोली येथे ६४, फोंडा बायपास परिसर ५२, कुडचडे येथे ३३, तर केपे येथे १७ प्रकरणांची नोंद झाली होती. मद्यधुंद वाहनचालकांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणे, रात्रीच्या वेळी अधिक वर्दळ असणारे रस्ते आणि पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मडगाव, वास्को, कोलवा आणि काणकोण या भागात तपासणी वाढवण्यात येणार आहे. शनिवार-रविवार, उत्सवाच्या दिवशी आणि रात्री उशिरा अचानक नाकाबंदी करून वाहन चालविणे हा रस्ते सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.
भाडेतत्त्वावर वाहने देणाऱ्या व्यवसायिकांनी ग्राहकांना वाहन सुपूर्द करण्यापूर्वी त्यांचा वाहनचालक परवाना तपासावा आणि त्यांना वाहतूक नियमांची माहिती द्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अल्पवयीन मुलांकडून भाड्याची वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे यासारख्या नियमभंगाविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे फातोर्डा वाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षक मिलोमिना कॉष्टा यांनी स्पष्ट केले. श्वासातील मद्याचे प्रमाण तपासणाऱ्या यंत्राद्वारे चालकांची तपासणी केली जाणार आहे.