पणजी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ बांधून अनेक वर्षे होऊनही तेथे हव्या त्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. एम. आर. आय मशीन नाही, युरोलॉजिस्ट व नेफरोलॉजिस्ट तज्ज्ञ नाहीत, औषधांचाही तुटवडा आहे. दरवर्षी १५ हजार रुग्णांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून गोमेकॉमध्ये हलवले जाते.
हे सर्व टाळण्यासाठी द. गो. जिल्हा इस्पितळात सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. ते म्हणाले, या इस्पितळात दोन रुग्णवाहिका असून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी हव्या त्या सर्व सुविधा उपलब्ध करा मागणी आलेमाव यांनी केली.
आमदार वीरेश बोरकर यांनी गोमेकॉत बेडची संख्या वाढवा, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा अशी मागणी करून अनेक प्रकरणांमध्ये ऑपरेशनसाठी सहा-सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे लोकांना खासगी इस्पितळात जावे लागते, असे बोरकर म्हणाले.
आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील गंभीर रुग्णांना गोमेकॉ बांबोळी येथे नेताना अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न...
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळामध्ये शक्य त्या सर्व सुधारणा केल्या आहेत. १५० जादा बेड वाढविण्यात आलेले आहेत. गोमेकॉत चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या असून आयसीयूच्या जादा बेड नव्या सुपर स्पेशलिटी इस्पितळात सुरू केल्याचे राणे म्हणाले. राज्यातील लोकांना चांगल्यात चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे राणे म्हणाले.