पणजी : पुढील सहा महिन्यांत सरकारी नोकरभरतीच्या माध्यमातून सुमारे सहा हजार ते आठ हजार अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथील सचिवालय जुन्या स्वातंत्र्यदिना दिनानिमित्त केलेल्या भाषणात जाहीर केले. गोव्याच्या रोजगार, कर्मचारी कल्याण आणि पायाभूत विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
नव्या बोरी पुलाच्या पायाभरणीचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याची घोषणा सावंत यांनी केली. दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. दरम्यान, पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉर गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीसाठी खुला येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर उत्तर गोव्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहतूक प्रवाह सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
रोजगारनिर्मिती, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला आणखी गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या घोषणांवरून स्पष्ट झाले. या स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाला मंत्री व आमदार, तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलिस खात्यातील चार पोलिसांना गेल्या स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलिस पदक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक' जुबेर मोमीन (पोलिस हवालदार) यांना तसेच, 'गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक' सुदेश नार्वेकर (उपअधीक्षक उत्तर गोवा वाहतूक पोलिस), गुरुदास गावडे, पोलिस अधीक्षक (एल अँड व्ही) आणि गुरुदास कदम, पोलिस अधीक्षक (एसडीपीओ वास्कोचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले) यांना देऊन सन्मान करण्यात आला.
प्रवास अधिक सुलभ, वेगवान होणार
सरकारी विभागांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे दीर्घकाळ कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी एलेव्हेटेड कॉरिडोअर, राष्ट्रीय महामार्ग आणि पुलांमुळे राज्यातील रस्ते संपर्कात मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.