

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) 'ओरिस कॉइन'शी संबंधित अनियंत्रित ठेवी गुंतवणूक योजनेद्वारे गुंतवणूकदारांची तब्बल २.४८ कोटींची क्रिप्टो करन्सी फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात रवी ठाकूर, राहुल जाधव आणि राहुल खुराणा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
चौथा आरोपी तरुण त्रिखा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मये-डिचोली येथील निलेश कार्बोटकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.
१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत संशयितांनी संगनमत करून 'ओरिस कॉइन' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनियंत्रित ठेवी गुंतवणूक योजना तयार केल्याचा आरोप आहे.
संशयितांनी गोव्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन या योजनेचा प्रचार करून जादा परताव्याचे आमिष दाखवले व गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम तसेच ऑनलाइन माध्यमातून पैसे स्वीकारण्यात आले.
मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदारासह अनेक गुंतवणूकदारांची एकूण २.४८ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोपपत्रात आरोप ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.