Revdanda Fish Market Pudhari
गोवा

Madgaon Fish Market | मडगाव येथील एसजीपीडीएच्या घाऊक व किरकोळ मासळी मार्केटच्या पाहणीत उघड झाल्या अनेक गंभीर त्रुटी

Madgaon Fish Market | आरोग्यासह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उपजिल्हाधिकाऱ्यांना पाहणी अहवाल सादर करणार

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या विशेष समितीच्या पाहणीत मडगाव येथील एसजीपीडीएच्या घाऊक व किरकोळ मासळी मार्केटमधील अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट, मासळीच्या कचऱ्याची साठवणूक, अपुरी पार्किंग सुविधा आणि अग्निसुरक्षेशी संबंधित प्रश्नांमुळे विक्रेते व ग्राहकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नव्या इमारतीचे अधिकृत उद्घाटन झालेले नसतानाही तिचा वापर सुरू असल्याने प्रशासकीय नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पाहणीचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, एसजीपीडीएची मासळी मार्केटमधील समस्यांचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यासाठी नऊ विविध सरकारी खात्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी या समितीने नव्याने बांधण्यात आलेल्या मार्केटच्या इमारतीसह संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पायाभूत सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थेतील अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

दूषित पाणी रस्त्यावर

मार्केटमधील गटारांमधून दूषित पाणी उघड्यावर वाहत असल्याचे पाहणीत आढळून आले. कापलेल्या मासळीचा कचरा क्रेटमध्ये साठवून ठेवण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या परिस्थितीमुळे विक्रेते आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

मासळीच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची गरजही अधोरेखित झाली. मूळतः घाऊक विक्रीसाठी असलेल्या या मार्केटमध्ये 'फिश कटिंग'ची सुविधा कशासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असा सवाल 'गोवा कॅन'चे संयोजक रोलंड मार्टिन यांनी उपस्थित केला.

घाऊक मार्केटमध्ये किरकोळ विक्री सुरू राहिल्यास बाजाराच्या मूळ उद्देशाला बाधा येऊ शकते, असे नमूद करून त्यांनी किरकोळ विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. मार्केट परिसरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहने उभी केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या मोठ्या जनरेटर सेटमुळे रिव्हर्स करंटचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक परवानग्याण्यात आल्या आहेत का, असा प्रश्नही मार्टिन यांनी उपस्थित केला.

अग्निसुरक्षेसह अन्य नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही तपासणी करण्यात येत आहे. पाहणीच्या वेळी उपस्थित नसलेल्या संबंधित विभागांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. सर्व बाबींची सखोल तपासणी आणि शहानिशा केल्यानंतर समिती आपला सविस्तर अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल, अशी माहिती रोलंड मार्टिन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT