Goa Election  
गोवा

Goa Elections 2025 | सावर्डे जिल्हा पंचायतमध्ये भाजपचा विजय; पाऊसकरांचा करिष्मा फसला

Goa Elections 2025 | भाजपची खेळी यशस्वी; माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचा चालला नाही करिश्मा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सर्वांचे नजर लागून असलेल्या धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघावर माजीमंत्री दीपक पाऊसकर यांचा करिष्मा चालू शकला नाही. आमदार गणेश गावकर, माजी खासदार विनय तेंडुलकर आणि युवा नेते संकेत अर्सेकर यांच्या एकत्रित राजकीय खेळीने पाऊसकर समर्थक अपक्ष उमेदवार आशिष गावकर यांना धोबीपछाड मिळाला.

अपेक्षेप्रमाणे काँग्रेसलाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे उमेदवार मोहन गावकर हे ९१८ मतांची आघाडी घेऊन विजय ठरले असून त्यांच्यासाठी संकेत अर्सेकर हे 'छोटा पॅकेट बडा धमाका' ठरले आहेत सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक आगामी विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची होती.

भाजपासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आधीपासून सावर्डे मतदारसंघात काँग्रेस पक्ष कमकुवत होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अद्याप येथे खाते खोलता आलेले नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीत ही त्यांची तीच अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या कुडचडे मतदारसंघाच्या शेजारी असलेला सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघ पाटकर यांना जिंकता आलेला नाही.

जिल्हा पंचायत निवडणुकीत खरी लढत भाजपचे उमेदवार मोहन गावकर आणि अपक्ष उमेदवार आशिष गावकर यांच्यातच होती. दीपक पाऊसकर यांनी उमेदवार आशिष गावकर यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.

मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर पावस्कर यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीचा पर्याय शिल्लक होता. त्यामुळे त्यांनी आपली सर्वशक्ती पणाला लावली होती.

आशिष गावकर यांच्या प्रचारासाठी ते स्वतः दारोदार फिरले होते. मात्र सावर्डेच्या मतदारांवर त्यांचा प्रभाव पडू शकला नाही. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, आमदार गणेश गावकर यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मोहन गावकर यांना उमेदवारी मिळाली.

सुरुवातीपासून आशिष गावकर यांच्याच नावाची चर्चा होते. पेरीठदक, आंबेउदक, सावरगाल, कोडली सारख्या भागात आशिष गावकर यांच्या नावाची जास्त चर्चा होती. शिवाय दाभाळ पंचायतीवर पावस्करांचा असलेला धबधबा आणि कामवखंड भागावर त्यांचे असलेले प्रभुत्व आशिष गावकर यांच्यासाठी फायदेशीर ठरेल असे चित्र निर्माण झाले होते.

पाऊसकर यांच्यासाठी धोक्याची घंटा...

सावर्डे पंचायत क्षेत्रावर पाऊसकर कुटुंबांचा जबरदस्त प्रभाव असूनही मोहन गावकर यांनी ७०० मतांची आघाडी घेतली आहे. किलपाल दाभाळ पंचायत क्षेत्रात ते केवळ सात मतांनी पिछाडीवर आहेत. पाऊसकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा समजली जाते.

काँग्रेसला आखावी लागणार ठोस रणनीती...

गेल्या कित्येक विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या काँग्रेससाठी यंदाची जिल्हा पंचायत निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. मतदारसंघातून घेतलेले विविध विषय आणि पंचायत क्षेत्रातील कथित भ्रष्टाचारावर त्यांनी उठवलेला आवाज अशी जमेची बाजू असतानाही काँग्रेसला केवळ ५५२ मतांवर समाधान मानावे लागले. आरजीने काँग्रेसच्या खालोखाल ४०५ मते घेतली आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीतील हा निकाल पाहता काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT