

म्हापसा पुढारी वृत्तसेवा
उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील नऊ जिल्हा पंचायती पैकी सहा पंचायतींवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. काँग्रेस पक्षाला दोन मतदारसंघातील विजयावर समाधान मानावे लागले. तर एका अपक्षाने आपल्या विजयावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब केला. मागच्या निवडणुकी पेक्षा कॉंग्रेस पक्षाने बार्देश तालुक्यात आणखी एका मतदारसंघावर विजय प्राप्त केला.
सकाळी अकराच्या दरम्यान निवडणूक निकालाला सुरुवात झाली. पहिल्यांदा शिवोली जिल्हा पंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. बार्देश तालुक्यातील बहुतेक सर्व उमेदवार नवीनच होते. फक्त दोन उमेदवार माजी जिल्हा पंचायत सदस्य होते. बार्देश तालुक्यातील जिल्हा पंचायत निवडणूक ही विद्यमान आमदार व मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची झाली होती.
यात हळदोणाचे आमदार अॅड. कार्लोस फरेरा, मंत्री रोहन खवटे, आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, आमदार केदार नाईक यांच्या समर्थक उमेदवारांनी विजय प्राप्त केला, तर मंत्री नीळकंठ हळर्णकर व आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्करावी लागली. सुकूर मतदारसंघातून भाजपाचे अमित अस्नोडकर विजयी ठरले, त्यांनी माजी जिल्हा पंचायत सदस्य अपक्ष उमेदवार कार्तिक कुडणेकर यांचा पराभव केला.
कुडणेकर हे गेल्या वेळी भाजपाचे जिल्हा पंचायत सदस्य तसेच उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खवंटे यांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. शिवोली जिल्हा पंचायत मतदारसंघात महेश्वर गोवेकर यांचा प्रचंड मताने विजय झाला. या मतदारसंघात आरजीपीचे जयेंद्रनाथ पाडोलकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.
महेश्वर गोवेकर यांना ४९५३ मते मिळाली तर पाडोलकर यांना ३२३९ मते मिळाली व रोशन चोडणकर यांना १२१८ मते मिळाली. हळदोणा जिल्हा पंचायत मतदारसंघातून काँग्रेसच्या मेरी ऊर्फ मारियो मिनेझिस विजय झाल्या. त्यांनी भाजपाचे सुभाष मोरजकर यांचा अवघ्या २७४ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती त्यांनी मोरोजकर यांच्या विजयासाठी बरेच परिश्रम घेतले परंतु आमदार कारलूस फरेरा यांच्या समर्थक मारिया यांनी बाजी मारली.
मारिया यांना ४७१२ मते मिळाली तर भाजपाचे सुभाष मोरजकर यांना ४४३८ मते मिळाली. कळंगुट जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपच्या फ्रान्सिलिया रॉड्रिग्स विजयी झाल्या. त्यांना ५६४६ मते मिळाली, तर कॉंग्रेसच्या कार्मेलीना फर्नाडिस यांना ५००३ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावरील आरजीपीच्या अनया कांदोळकर यांनी ३७१९ मते घेतली. रेईस मागुस जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपाच्या रेश्मा बांदोडकर विजय ठरल्या.
स्थानिक आमदार केदार नाईक यांच्या समर्थक असलेल्या रेशमा बांदोडकर यांना मते मिळाली. पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत मतदारसंघातून संदीप साळगावकर हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्या एल्डरीच डिसोझा यांचा पराभव केला. साळगावकर यांना ७५११ मते मिळाली, तर डिसोझा यांना २७७२ मते मिळाली. शिरसई जिल्हा पंचायत मतदारसंघावर काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले या मतदारसंघातून काँग्रेसचे निलेश कांबळी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार सागर मावळणकर यांचा पराभव केला.
या मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी समर्थन दिलेले दोन्ही उमेदवार पराभूत झाल्यामुळे त्यांना नामुष्की पत्करावी लागली आहे. विजयी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कांबळी यांना ३२५८ मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार सागर मावळणकर यांना २९१९ मते मिळाली व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरजीच्या सिप्रियान परेरा यांना १५७९ मते मिळाली. कोलवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसने काँग्रेसने अपक्ष उमेदवार कविता कांदोळकर यांना समर्थन दिले होते, तर शिरसईचे नीलेश कांबळी यांना माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पाठिंबा दिला होता.
कोलवाळ मतदारसंघात पुन्हा कविता कांदोळकर
कोलवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा अपक्ष उमेदवार कविता किरण कांदोळकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या सपना मापारी यांच्यावर दुसऱ्यांदा कुरघोडी केली. आरजीच्या प्रज्ञा सावंत यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. हा मतदारसंघ स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर, माजी आमदार किरण कांदोळकर तसेच रिव्होल्युशनरी गोवन पक्षाचेचे मनोज परब यांनी प्रतिष्ठेचा केला होता, परंतु किरण कांदोळकर यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. कविता कांदोळकर यांना ५६३५ मते मिळाली तर सपना मापारी यांना ४२४४ व आरजीपीच्या प्रज्ञा सावंत यांना १९९६ मते मिळाली.
हणजणमध्ये भाजप विजयी...
हणजूण जिल्हा पंचायत मतदार संघातून अटीतटीच्या लढतीत भाजपचे नारायण मांद्रेकर यांनी आपले प्रतिस्पर्धी योगेश गोवेकर उर्फ मोगॅम्बो यांचा २७० मतांनी पराभव केला. उत्तर गोव्यातून या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष होते. काँग्रेसने आमदार डिलायला लोबो यांना नामोहरम करण्याचा चंग बांधला होता. या मतदारसंघात आरजीपीने तिसऱ्या क्रमांकावर मते प्राप्त केली.