Satish Dhond BJP West Bengal
पणजी : देशभराचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत बहुमताकडे झेप घेतली आहे. या यशामागे अनेक नेत्यांचे योगदान असून, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांची भूमिकाही विशेष ठरली आहे. गोव्याचे सुपुत्र असलेल्या धोंड यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक मानले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये 2017 साली भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2021 च्या निवडणुकीत पक्षाने 77 जागांपर्यंत मजल मारली, आणि यावेळी जवळपास 200 जागांचा टप्पा गाठण्याची कामगिरी केली आहे. या प्रवासात संघटनबांधणीसाठी गेली चार वर्षे सातत्याने काम करणाऱ्या सतीश धोंड यांचे योगदान लक्षणीय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच इतर केंद्रीय आणि स्थानिक नेत्यांसोबत धोंड यांनी प्रभावी समन्वय साधत पक्षाची मुळे तळागाळात मजबूत केली. त्यांनी स्थानिक नेतृत्वाला बरोबर घेऊन सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि “देश प्रथम” ही भावना जनमानसात रुजवली.
ज्येष्ठ नेता असूनही सतीश धोंड यांनी स्वतःला नेहमी कार्यकर्ता मानले आहे. त्यांनी कधीही पद किंवा उमेदवारीची अपेक्षा न ठेवता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळाले असून, दीर्घकाळ सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
गेल्या चार वर्षांत पश्चिम बंगालमध्ये पक्षबांधणीचे काम केले. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक नेत्यांसह काम करत भाजपला जनतेपर्यंत पोहोचवले. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत आणि पक्षाला सत्ता मिळत असल्याचा आनंद आहे. यापुढे यावर अधिक भाष्य करणार नाही; पक्षाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतेच अधिकृत प्रतिक्रिया देतील.– सतीश धोंड (संघटनमंत्री, भाजप, पश्चिम बंगाल)