सासष्टी: विद्यानगर घोगळ येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी दोषी ठरवलेला आरोपी भरत चौधरी याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शेरीन पॉल यांनी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
तसेच एक लाख रुपये दंड. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीने अतिरीक्त दोन वर्षे साधी कैदेची शिक्षा भोगावी. त्याचप्रमाणे आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ५० हजार रुपये प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले ललित ऊर्फ डुंगराम चौधरी याला देण्यात यावे असे न्यायाधिशांनी आदेशात म्हटले आहे. ७ जानेवारी २०२३ रोजी वरील घटना घडली होती. भरत याने ललित याच्यावर कोयत्याने हल्ला केलह होता. यात ललित हा गंभीर जखमी झाला होता.
ललित हा विद्यानगर येथे भाड्याने हार्डवेयरचे दुकान चालवित होता. तर भरत हा त्याच्याकडे कामाला होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. पैशांच्या देण्याघेण्यावरून उभायातांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. यातूनच हा हल्ला झाला होता. या घटनेनंतर भरत फरार झाला होता. फातोर्डा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर त्याला अटक केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.