Goa Farming 
गोवा

Goa Farming | शेती हाच यशस्वी करिअर अन् स्वावलंबनाचा पाया!' गोवा पालयेतील महिला शेतकरी संपदा तारी यांचा आदर्श

Goa Farming | भंडारवाडा-पालयेतील प्रगतिशील शेतकरी संपदा तारी यांची २५०० झेंडू रोपांची यशस्वी लागवड

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत प्रामाणिकपणे कष्ट केले तर शेतीतूनही 'हरितक्रांती' घडवता येते. शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता तरुण-तरुणींसाठी यशस्वी करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम आधार ठरू शकतो, असे मत भंडारवाडा-पालये येथील प्रगतिशील महिला शेतकरी संपदा तारी यांनी व्यक्त केले.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराच्या परिसरातील तसेच पूर्वी पडीक असलेल्या माळरानाचा कल्पकतेने उपयोग करून संपदा तारी यांनी विविध प्रकारची फळे, फुले आणि भाजीपाल्याची लागवड केली आहे. विशेषतः झेंडूच्या फुलांच्या शेतीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय स्वतःची नर्सरी विकसित करून विविध फळझाडे व फुलझाडांची रोपे तयार करण्याचे कामही त्या करतात.

यंदा त्यांनी तब्बल २ हजार ५०० झेंडूच्या रोपांची लागवड केली असून दोन वेगवेगळ्या जातींच्या झेंडूचे उत्पादन त्या घेत आहेत. विशेष म्हणजे लागवडीसाठी लागणारी बहुतांश रोपे त्या स्वतःच्या नर्सरीत तयार करतात. त्यांच्या नर्सरीतील रोपांना पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही मागणी आहे.

सरकारच्या विविध कृषी योजनांविषयी बोलताना संपदा तारी म्हणाल्या, सरकारी योजनेचा लाभ घेतल्यानंतर त्याचा उपयोग प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. एखाद्या योजनेमुळे आपण स्वावलंबी झालो, तर तीच योजना शेजारील शेतकरी किंवा महिलेला कशी मिळेल आणि तीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कशी होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

त्यांच्या मते, सरकारी योजनांकडे केवळ अनुदान म्हणून न पाहता त्यातून कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. योग्य नियोजन, सातत्य, कष्ट आणि बाजारपेठेची गरज ओळखून पीक घेतल्यास शेती करताना जमिनीचा कस टिकून रहावा, यासाठी संपदा तारी गांडूळ खताचा वापर करण्यास प्राधान्य देतात. शक्य तितक्या नैसर्गिक पद्धतीने दर्जेदार उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मात्र यंदा पावसातील अनियमिततेचा काही प्रमाणात झेंडूच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. निसर्गामुळे नुकसान झाले तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने शेतीकडे वळणे हाच त्यांचा दृष्टिकोन आहे. एखाद्या पिकाचे नुकसान झाले म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा त्याच जमिनीत पुढचे पीक कोणते आणि कसे घेता येईल, याचा विचार मी करते, असे त्या सांगतात.

मुलांचीही शेतीत मोलाची साथ

संपदा तारी यांच्या या कृषी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचीही महत्त्वाची साथ आहे. त्यांची मुले आपापली नोकरी व कामे सांभाळून शेती व्यवसायाकडे लक्ष देतात. झेंडूची लागवड, रोपांची निगा, पाणी व्यवस्थापन तसेच इतर शेतीकामांत मुलांकडून मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात झेंडूला मोठी मागणी

गोव्यात झेंडूच्या फुलांना वर्षभर मागणी असली तरी गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या काळात मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाजारपेठेतील मागणीचा अंदाज घेऊन योग्यवेळी रोपांची लागवड करणे महत्त्वाचे असल्याचे तारी सांगतात. झेंडूच्या रोपांची योग्य निगा राखली, खत-पाणी व्यवस्थापन वेळेवर केले आणि रोगांपासून संरक्षण केले, तर एका चांगल्या रोपापासून साधारण एक ते दीड किलोपर्यंत फुलांचे उत्पादन मिळू शकते, असा त्यांचा अनुभव आहे.

पर्यटनाला शेतीची जोड देण्याचा प्रयत्न:

केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न राहता कृषी क्षेत्राला पर्यटनाची जोड देण्याचाही संपदा तारी यांचा प्रयत्न आहे. परिसरात विविध फळे, फुले आणि हिरवाई निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने त्यांनी फार्म हाऊसची संकल्पनाही पुढे नेली आहे. पर्यटकांनी ग्रामीण भागात येऊन प्रत्यक्ष शेती, फुलबागा आणि फळबागांचा अनुभव घ्यावा, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे.

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी:

पडीक माळरानाची हिरव्यागार शेतीत रूपांतर, स्वतःची नर्सरी, झेंडूची व्यावसायिक लागवड, सेंद्रिय खतांचा वापर आणि इतर महिलांनाही स्वावलंबनाकडे नेण्याची भूमिका यामुळे संपदा तारी यांचा कृषी प्रवास परिसरातील महिला आणि नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT