पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन झाल्याचा कथित आरोप करत अभिनेता सलमान खान यांच्या मालमत्तेविरोधात मुंबई न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका कळंगुट मतदारसंघ मंचने दाखल केली आहे.
याचिकेत उच्च संबंधित बांधकामांना परवानगी देताना नियमांची पायमल्ली झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेरूल नदीच्या काठाच्या भागातील सिंकेरी येथे अभिनेता सलमान खान याने २०१७ साली जमीन मालमत्ता घेतली होती त्यातील काही भाग हा ना विकास क्षेत्र असलेल्या सीआरझेड क्षेत्रात पडतो.
काही दस्तावेजामध्ये फेरफार करून या मालमत्तेच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले बांधकाम परवाना तसेच इतर परवाने मिळवण्यात आले. सिंकेरी येथील सर्वे क्रमांक ८२/एफ-१ या मालमत्तेच्या एक चौदाच्या उताऱ्यात खान याच्या नावाचा समावेश आहे.
ही याचिका जानेवारीमध्ये उच्च न्यायालयाच सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये याचिकादार तसेच सिकेरी- कांदोळी येथील ग्रामस्थांनी सेंट लॉरेन्स चर्च येथे जमा होऊन या सीआरझेडमधील व्यावसायिक व रिअल इस्टेट बांधकामाला विरोध केला होता.
तसेच या बांधकामाविरोधात न्यायालयात याचिका सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलमान खान याच्या सिकेरी येथील बांधकामाबरोबरच कांदोळी येथील काही ऑर्चिड जमिनीचे रुपांतर करून तसेच सीआरझेड उल्लंघन करून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाविरोधातही याचिकादाराने तक्रारी दाखल केलेल्या आहेत.