पणजीः साळगाव येथील दुहेरी हत्याकांडातील संशयिताला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ओडिशा येथे अटक करण्यात आली. गुन्हा शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दल माहिती दिली.
मुख्य संशयित जगन्नाथ भगत (रा. मूळ छत्तीसगड) नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा केल्यानंतर लगेचच गोव्यातून फरार झाला होता व तेव्हापासून बेपत्ता होता. सातत्यपूर्ण तांत्रिक पाळत आणि सततच्या निरीक्षणाद्वारे त्याचा शोध घेऊन त्याला ओडिशामध्ये अटक करण्यात आली. साळगाव मुद्दावाडो येथील रहिवासी जॉर्ज नोरोन्हा यांनी ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
नोरोन्हा यांनी पोलिसांना माहिती दिली की, ०५ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री उशिरा ते ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळच्या दरम्यान साळगाव येथील घर क्रमांक ३/८४ मध्ये रिचर्ड डीमेलो आणि अभिषेक गुप्ता या दोघांची निघृण हत्या करण्यात आली.
प्राथमिक तपासात उघड झाले की, दोघांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर धारधार शास्त्राने हल्ला झाल्याने प्राणघातक जखमा झाल्या होत्या. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी तक्रारदाराला त्याच्या भाड्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही मृतदेह आढळले होते.