साळ नदी 
गोवा

Goa Sal River fishing crisis - साळ नदीतील जलपर्णीमुळे मच्छीमार संकटात

माशांच्या उत्पादनात घट, जाळ्यांचेही होतेय मोठे नुकसान; आमदार क्रूझ सिल्वांकडून भरपाई देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : साळ नदीत गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या जलपर्णीमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. बेटूल, असोळणा आणि चिंचणी येथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या मासेमारीवर याचा मोठा परिणाम झाला असून, जाळ्यांमध्ये जलपर्णी अडकत असल्याने मासेमारी करणे अत्यंत कठीण झाले आहे. परिणामी माशांचे उत्पादन घटल्याने मच्छीमारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, साळ नदीतील जलपर्णीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नदीच्या अनेक भागांवर तिचे दाट आच्छादन निर्माण झाले आहे. मासेमारीसाठी टाकलेली जाळी सतत जलपर्णीत अडकत असल्याने जाळ्यांचे नुकसान होत आहे. अनेकदा जाळी बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत असून वेळ आणि खर्चही वाढत आहे. त्यामुळे मासेमारीचा कालावधी कमी झाला असून मिळणाऱ्या मासळीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.

मच्छीमारांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून ही समस्या कायम असून संबंधित विभागांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मासेमारीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम झाला असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वेलीमचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी प्रभावित मच्छीमारांना योग्य आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच साळ नदीतील जलपर्णी तातडीने हटवून नदी पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

साळ नदीतील जलपर्णीचे कायमस्वरूपी निर्मूलनासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविणे, आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याची मागणी केली. अन्यथा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पर्यावरणीय संतुलनालाही धोका

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, जलपर्णी ही वेगाने पसरणारी आक्रमक वनस्पती असून ती नदीतील पाण्याचा प्रवाह अडवते, विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी करते आणि जलचरांच्या अधिवासावरही प्रतिकूल परिणाम करते. त्यामुळे केवळ मच्छीमारांच्याच नव्हे, तर संपूर्ण साळ नदीच्या पर्यावरणीय संतुलनालाही धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT