Margao Nehru Stadium 
गोवा

Margao Nehru Stadium | "नेहरू स्टेडियमच्या छताखाली मृत्यूचा सापळा!; प्रवेशद्वारासमोरील पत्रे गंजून जीर्ण, कोसळण्याचा मोठा धोका"

Margao Nehru Stadium | प्रवेशद्वारासमोरील पत्रे गंजून जीर्ण ; तुटलेल्या स्थितीत कधीही कोसळण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सर्वांत महत्त्वाच्या क्रीडा संकुलांपैकी एक असलेल्या मडगावच्या नेहरू स्टेडियममध्ये खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्टेडियमच्या प्रवेशद्वार क्र. ८ वरील छताची लोखंडी पत्रे आणि आधारसंरचना मोठ्या प्रमाणात गंजून जीर्ण झाली असून काही पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत.

पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे ही पत्रे कधीही खाली कोसळू शकतात. त्यामुळे स्टेडियम परिसरातून ये-जा करणारे खेळाडू, नागरिक, पादचारी आणि वाहनचालक यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मडगावमधील नेहरू स्टेडियम हे राज्यातील प्रमुख क्रीडा केंद्र म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा, फुटबॉल सामने, विविध क्रीडा स्पर्धा तसेच प्रशिक्षण शिबिरे येथे नियमितपणे आयोजित केली जातात. त्यामुळे दररोज शेकडो खेळाडू, प्रशिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी आणि नागरिक या परिसरात ये-जा करत असतात. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी छताची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विशेषतः प्रवेशद्वार क्रमांक ८ वरील छताची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. लोखंडी पत्रे पूर्णपणे गंजल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना छिद्रे पडली आहेत, तर काही पत्र्याचे कडे तुटून लोंबकळत असल्याचे दिसून येते. पत्र्यांना आधार देणारे लोखंडी चॅनेलही मोठ्या प्रमाणात गंजले असून त्यांच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्याच्या वेळी संपूर्ण पत्रा किंवा त्याचे तुकडे खाली पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, छतावरील गंज आणि जीर्णावस्था ही काही दिवसांतील समस्या नसून गेल्या अनेक महिन्यांपासून ती वाढत आहे. तरीही संबंधित विभागाकडून आवश्यक दुरुस्ती किंवा देखभाल करण्यात आलेली दिसत नाही. नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे नेहरू स्टेडियम हे राज्य सरकारच्या क्रीडा पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली देखभाल वेळेवर होणे अपेक्षित असताना छताची अशी दयनीय अवस्था दिसून येत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्टेडियम प्रशासन, क्रीडा प्राधिकरण आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संपूर्ण छताची तांत्रिक पाहणी करावी, गंजलेले पत्रे व आधारसंरचना त्वरित बदलावी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, अशी मागणी क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

नागरिक, खेळाडूंच्या सुरक्षेशी तडजोड नाही : तवडकर

नेहरू स्टेडियमच्या छतावरील लोखंडी पत्रे आणि आधारसंरचना मोठ्या प्रमाणात गंजल्याने ती कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री तवडकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नेहरू स्टेडियमच्या छताची अवस्था धोकादायक असल्याची माहिती मला आज सकाळीच मिळाली. त्यानंतर मी तत्काळ अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पाहणी अहवालानुसार आवश्यक त्या सर्व दुरुस्तीची कामे कोणताही विलंब न लावता हाती घेतली जातील. नागरिक आणि खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुर्घटना घडण्यापूर्वी कारवाई करा : ऑलिव्हेरा

कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नेहरू स्टेडियमच्या छताची सद्यस्थिती पाहता संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे ही काळाची गरज बनल्याचे मत फुटबॉलपटू फ्रान्सिस ऑलिव्हेरा यांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT