गोवा

Matoli Bazaar | गोव्यातील ऐतिहासिक बाणस्तारी बाजारात माटोळी खरेदीसाठी भाविकांची तुफान गर्दी!

Matoli Bazaar | गोव्यातील ऐतिहासिक बाणस्तारी बाजारात माटोळी खरेदीसाठी भाविकांची तुफान गर्दी!

पुढारी वृत्तसेवा

माशेल : पुढारी वृत्तसेवा
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बाणस्तारी बाजारात गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपापली वाहने घेऊन येतात. तिवरे-वरगाव, माशेल, हडकोण, खांडोळा, कुंकळे, केरी, सावईवेरे यांसह अन्य ग्रामीण भागातील विक्रेते माटोळीचे साहित्य तसेच चतुर्थीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी घेऊन येतात.

गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या जवळपास सर्व वस्तू या बाजारात उपलब्ध होत असल्याने बाणस्तारी बाजाराला विशेष महत्त्व आहे. जणू काही हा बाजार पारंपरिक चतुर्थीच्या आठवणी जपणारा ठेवा ठरला आहे. दरवर्षी वस्तूंचे दर वाढत असले तरी ग्राहक आणि विक्रेत्यांमधील उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून येते.

यंदा पावसाने दडी मारल्याने नागरिकांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय मनसोक्त खरेदी केली. मात्र, बाजारातील नेहमीची लगबग तुलनेने कमी होती. याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी माटोळीचे साहित्य विक्रीसाठी मांडले होते. त्यामुळे बाजारात जाण्याऐवजी रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करून खरेदी करणे नागरिकांना अधिक सोयीचे ठरले.

तसेच विविध बागायतदार आणि दुकानांमध्येही माटोळीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने पारंपरिक विक्रेत्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. कुळागरी विक्रेत्यांनी आपल्या बागायतातून विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंची अपेक्षित विक्री न झाल्याने त्या घेऊन परतीची वाट धरावी लागल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यामुळे बाजारात उभे राहून खरेदी करण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. वाहतूक पोलिसांची उपस्थिती असूनही वाहतूक कोंडी होत होती. बाजार परिसरात पथदीपांच्या मंद प्रकाशातच खरेदी-विक्री सुरू होती. काही ठिकाणी विक्रेते बसलेल्या ठिकाणी वीजपुरवठ्याची कोणतीही सोय नव्हती, अशी तक्रार काही विक्रेत्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT