RG MLA Viresh Borkar  
गोवा

'तो' ६५ चौ. मीटरचा बंगला भावाचा, माझा नव्हे !

आमदार वीरेश बोरकर : अंतर्गत वाद विसरून गोव्याच्या हितासाठी एकत्र या

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सांतआंद्रे येथील ज्या बंगल्याबाबत माझ्यावर राजकीय आरोप करण्यात आले, तो बंगला माझा नसून माझ्या भावाचा आहे. तो अवघ्या ६५ चौरस मीटर जागेवरील एक साधा मध्यमवर्गीय बंगला असून, कोणतीही वस्तुस्थिती न तपासता त्याचे राज्यव्यापी राजकीय प्रकरण करण्यात आले, ही दुर्दैवी बाब असल्याचे मत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर यांनी व्यक्त केले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोरकर यांनी प्रथमच पक्षातील वीरश बोरकर अंतर्गत वाद, सांतआंद्रे येथील कथित बेकायदेशीर बंगल्याचा वाद तसेच पक्षातील घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय वादावर उत्तर देताना त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घराचा अनावश्यक राजकीय मुद्दा करून कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याची खंत व्यक्त केली.

'मी एका छोट्या गावात कुटुंबासह राहणारा सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे. मात्र माझ्याविरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात आहे. पक्षातील काही जणही माझ्याविरोधात काम करत आहेत. पक्षाचे अधिकृत युट्यूब चॅनेल आणि ई-मेल आयडी, जे आम्हीच तयार केले होते, ते हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या सर्व घटनांमुळे मोठा मनस्ताप झाला आहे,' असे बोरकर म्हणाले.

पक्षातील वाढत्या अंतर्गत संघर्षावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, गोव्यासाठी सुरक्षित आणि शांततापूर्ण भविष्य घडविण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. मात्र काही जण मूळ उद्दिष्टापासून भरकटत आहेत. या अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजप आणि इतर विरोधी पक्षांना होत आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारण थांबवून पुन्हा एकत्र येऊन पक्ष मजबूत करण्याची गरज आहे. मनोज परब यांनी राजीनामा दिला तेव्हा मी गोव्याबाहेर होतो. त्यांच्या निर्णयाने मला धक्का बसला. आमच्यात आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही ते म्हणाले.

आरजीपी सदैव एकत्र !

आरजीपीमध्ये मतभेद असले तरी पक्षाची विचारधारा आणि गोव्याच्या विकासाचे उद्दिष्ट कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरेल. पक्ष फोडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास वीरेश बोरकर यांनी व्यक्त केला.

सध्या 'मोग' फक्त गोव्यावरच !

वैयक्तिक आयुष्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोरकर म्हणाले, 'ठराविक वयानंतर प्रत्येक जण स्वतःचा जीवनसाथी निवडतो. मात्र सध्या मी लग्नाचा विचार करत नाही. सध्या माझे प्रेम फक्त गोव्यावर आहे. गोव्यासाठी अनेक गोष्टी बदलायच्या आणि सुधारायच्या आहेत. ते ध्येय पूर्ण झाल्यानंतरच लग्ना चा विचार करेन.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT