मडगावातील रेषे वेर्णेकरचा थक्क करणारा प्रवास; संगीताची आवड जोपासत मिळवली सरकारी नौकरी
कंप्यूटर इन्स्ट्रक्टर, संगणक शिक्षक म्हणूनही केले काम
मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातही गायन सादरीकरण
मडगाव पालिकेत कनिष्ठ कारकून म्हणून कार्यरत
मडगाव : रविना कुरतरकर
काही स्वप्नांना पंख देण्यासाठी डोळ्यांनी जग पाहण्यापेक्षा मनात जिद्द, कर्तृत्वावर विश्वास आणि ध्येय गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. याच जिद्दीच्या बळावर मडगाव येथील रेखा वेर्णेकर यांनी आपल्या आयुष्याला यशाचे नवे सूर दिले आहेत. जन्मतः दृष्टिहीन असतानाही संगीताची साधना, शिक्षणाची ओढ आणि स्वावलंबनाचे स्वप्न त्यांनी कधीही सोडले नाही.
सुरांच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करताना संगणक प्रशिक्षण आणि नोकरीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांतून त्यांनी यशाची नवी वाट शोधली. आज मडगाव पालिकेत कनिष्ठ कारकून म्हणून रुजू झालेल्या रेखा यांचा प्रवास केवळ एका नोकरीच्या यशाचा नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा प्रेरणादायी आलेख आहे.
रेखा यांना बालपणापासूनच संगीताची विशेष आवड होती. रेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील गाणी ऐकताना त्यांचे मन संगीताच्या सुरांमध्ये रमू लागले. त्यांच्यातील ही आवड ओळखून आईने त्यांना प्रोत्साहन दिले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
मडगाव येथील दामोदर विद्या भवनमध्ये स्वरमंचाच्या माध्यमातून गुरु सुभाष प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. २०१८ पासून त्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे.
लवकरच 'बेस्ट अचिव्हमेंट' पुरस्कार:
या प्रवासात सहकार्य करणाऱ्यांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रेखा यांनी विविध संगीत कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, मे २०२१ मध्ये 'सूर नवा ध्यास नवा' या वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. १७ जानेवारी रोजी त्यांना 'बेस्ट अचिव्हमेंट ऑफ डिजेबल वुमन' साठी १३ एडिशन ऑफ द ऑर्किड अवार्ड, देऊन त्यांना सम्मानित केले जाणार आहे.
आई सदैव पाठीशी : रेखा
जीवनाच्या आजपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात माझी आई माझ्यासोबत खबीबणे अत्यंत प्रोत्साहन देऊन माझ्या पाठीशी उभी राहिली. आज मी जे काही करत आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या आईला द्यावे लागणार आहे. नोकरीची नवी जबाबदारी सांभाळताना संगीत क्षेत्रातही प्रगती करण्याचा माझा मानस आहे.
आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रत्येक संभेचे स्वागत करणारा माझा प्रवास जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा सुरेल संगम ठरला आहे, असे रेखा वेर्णेकर यांनी सांगितले.
संगीतासोबत संगणकाचे ज्ञान मिळवण्यावरही त्यांनी भर दिला. पणजी-सांताक्रुझ येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एनएबी) येथे त्यांनी संगणक प्रशिक्षण घेतले.
तसेच डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणानंतर त्यांना याच संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नोकरी करताना पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना बंगलोर येथे जावे लागले. तिथे कंप्यूटर इन्स्ट्रक्टर तसेच म्युझिक टीचर, असेही त्यांनी काम केले.
दरम्यान, वर्तमानपत्रातील नोकरीच्या जाहिरातींचा नियमित अभ्यास करत त्यांनी खाजगी आणि सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज केले. मडगाव नगरपालिकेच्या कनिष्ठ कारकून पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी या पदासाठी अर्ज केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांना त्यांनी अर्जाबाबत माहिती दिली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि रेखा नगरपालिकेत रुजू झाल्या.