पणजी : भारताच्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीच्या प्रतिनिधी नोंदणीस शुक्रवारी (दि.4) प्रारंभ झाला. 'इफ्फी' च्या ऑनलाईन पोर्टलवर सुरुवात झाली आहे. पणजी येथे हा चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यामध्ये जगभरातील ३०० हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे यंदा या महोत्सवासाठी असणाऱ्या शुल्कात कपात केली असून हे शुल्क १००० रुपये वरून आता ८०० रुपये केले आहे.
केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण खाते, गोवा सरकारची मनोरंजन सोसायटी यांच्यामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवासाठीच्या तयारीला वेग आला असून सुकाणू समितीची पहिली बैठक नुकतीच पणजी येथे झाली होती. महोत्सव संचालक प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी संपूर्ण महोत्सवाचा आढावा घेऊन शुल्कामध्ये कपातीची सूचना केली होती त्याला केंद्राने राज्य सरकारने संमती दिल्याने शुल्कात कपात करण्यात आली आहे.