रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि अंकगणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सभागृहात मंगळवारी अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत झाला.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे कोणताही आर्थिक तरतुदीचा ठराव मंजूर केला नाही. शिक्षण विभागाच्या सभागृहात मंगळवारी अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक झाली.
यावेळी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व अंकगणित क्षमतांना प्राधान्य दिले आहे.
त्यानुसार शाळांमध्ये 'मिशन आरंभ' अभियान राबवण्यात येणार असून, पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांची १०० गुणांची परीक्षा घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे, पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करणे तसेच प्राथमिक शाळांतील सेमी वर्गांना मान्यता देण्याबाबतही चर्चा झाली. १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्याने नियोजन करण्याचे आदेश सभापती मुरकर यांनी दिले.
आचारसंहितेमुळे वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला ब्रेक
जिल्ह्यात विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने शाळांच्या दुरुस्तीच्या कामांवर परिणाम झाला आहे. जूनमध्ये शाळा सुरू होणार असताना अनेक ठिकाणी वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी, पावसाळ्यात विद्यार्थ्यांना नादुरुस्त खोल्यांमध्ये बसावे लागू शकते. तात्पुरती डागडुजी करण्याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.