Death Pudhari
गोवा

Goa Suicide Case | गावडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; पत्नीच्या तक्रारीत कारागृह अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप

Goa Suicide Case | पत्नीच्या तक्रारीत कारागृह अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन केलेल्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने अधिकाऱ्यांकडून सातत्याने झालेल्या छळवणुकीसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या तक्रारीमुळे कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले आहेत.

या तक्रारीनुसार, दीर्घ रजेनंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर गावडे यांच्या कामाच्या स्वरूपात अचानक बदल करण्यात आला. त्यांना पूर्वीच्या कामकाजापेक्षा वेगळ्या पद्धतीने दररोज हजर राहण्यास सांगितले जात होते. या बदलांमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेला मानसिक त्रास आणि दबाव असल्याचा संशय मयत पत्नी ऋतुका गावडे यांनी व्यक्त केला आहे.

तक्रारीत संबंधित कारागृह अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी पत्नीने केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतीच्या मृत्यूरा कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

ऋतुका गावडे यांनी तक्रारीत असेही नमूद केले आहे की, त्यांच्या पतीने यापूर्वी कारागृह महानिरीक्षक आणि कोलवाळ केंद्रीय कारागृहाच्या अधीक्षकांकडे राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यावर कोणताही लेखी प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी तो राजीनामा मागे घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

सहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण आपल्याकडे आले आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT