पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
हल्लीच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने डिजिटल माध्यमाद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असल्याचे प्रकार घडतात. यावर आळा घालण्यासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा कार्यरत असून अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिस यशस्वी झाले आहेत.
पर्वरीतील पोलिस स्थानकात नुकताच सायबर क्राईम कक्ष चालू करण्यात आला असून, निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी पुढे सांगितले की, हल्ली ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवण्याचा प्रकार वाढीस लागले आहेत.
जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना माहिती देण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहारामध्ये कशी काळजी घ्यावी, शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर नागरिकांनी अनोळखी लिंक उघडू नये अशा लिंकद्वारे अधिक फसवणुकीचे प्रकार घडतात. आता शैक्षणिक संस्था, विद्यालये खुली होणार आहेत.
जनजागृती मोहीम सुरू होणार
पर्वरी मतदारसंघातील विविध विद्यालये आणि शैक्षणिक संस्थामध्ये जनजागृती करण्याची मोहीम आम्ही सुरू करणार आहोत. एखाद्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाली, तर त्वरित आमच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्याचे तसेच १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी केले आहे.