पणजी : पुढारी वृत्तसेवा
बनावट उत्पादन शुल्क आयुक्त नियुक्ती प्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित अजित शंखवाळकर याच्याविरोधात ९७ लाखांच्या भूखंड फसवणुकीचा दुसरा गुन्हा पर्वरी पोलिसांनी दाखल केला आहे.
पणजी पोलिसांचा तपास पूर्ण होऊन त्याला न्यायालयीन कोठडी पाठवल्यानंतर त्याला पर्वरी पोलिस चौकशीसाठी अटक करणार असल्याची माहिती पर्वरी अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूखंड देण्याचे आमिष दाखवून संशयिताने तळेकर कुटुंबीयांकडून ९७ लाख रुपये घेतले होते. अनेक महिने उलटले तरी संशयिताने भूखंड दिला नाही.
त्यामुळे तळेकर कुटुंबियाने पैसे परत करण्याची विनंती संशयिताला केली मात्र त्याने ते पैसे परत न करता फसवणूक केल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अजित शंखवाळकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, बनावट उत्पादन शुल्क आयुक्त नियुक्ती प्रकरणाशी संबंधित संशयित अजित शंखवाळकर याला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली असून त्याची चौकशी पणजी पोलिस करत आहेत. त्याने बनावट दस्तावेजाद्वारे भूखंड देण्याचे किंवा किती जणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लुबाडले आहे याची सखोल चौकशी पोलिस करत आहेत.
याव्यतिरिक्त त्याच्या मालमत्तेचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बनावट अबकारी आयुक्त नियुक्तीपत्रप्रकरणी संशयित अजित याच्यासह त्याच्या पत्नीलाही सहसंशयित करण्यात आले आहे.