पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
येथे उभारण्यात येत असलेल्या ५.५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचा अंतिम, १४३१ वा सेगमेंट शनिवारी यशस्वीरित्या बसविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, प्रकल्प अभियंता दत्तप्रसाद कामत, प्रकल्प संचालक मनीष कांगे, व्यवस्थापक चंद्रशेखर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलासाठी ८८ खांब, ८७ स्पॅन आणि १४३१ सेगमेंट उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प साकार होत आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर असून, गेल्या १२ वर्षांत सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. 'प्रधानमंत्री गती शक्ती' अभियानांतर्गत राज्यात विविध विकासकामे सुरू असून 'हरित गोवा, स्वच्छ गोवा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पर्यटनवृद्धीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जात असून, उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वी दोन दिवस हा पूल नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी गेल्या अडीच वर्षांत या प्रकल्पादरम्यान पर्वरीकर आणि वाहनचालकांनी मोठ्या संयमाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण करणाऱ्या आरआरएसएम कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणाऱ्या कंपनीचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले. पर्वरीकरांनी दाखविलेल्या संयमामुळेच हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगत, सप्टेंबरमध्ये उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.