CM Devendra Fadnavis | राज्यात ‘रेल्वे फाटकमुक्त’साठी पायाभूत सुविधा उभारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; रेल्वेच्या १३१ पैकी ६५ कामांना मान्यता
CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : ‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आमदार प्रसाद लाड बैठकीस उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील (अंडर पास) रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणाकरिता पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत. मान्यता देण्यात आलेल्या ६५ कामांमधील संबंधित रस्त्यांवरील २५ हजार ते १ लाखापर्यंत ‘टीव्हीयू‘ (ट्रेन व्हेईकल युनिट) असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. वाढते शहरीकरण लक्षात घेता शहरांमधील रेल्वे पायाभूत सुविधांची ८० कामे नियोजित करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास या भागातील नागरिकांना त्यांच्या मागणीआधीच पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हुडकोकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर चौकाच्या ठिकाणी भविष्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. अशा ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्याबाबत कार्यवाही करावी. अमरावती- बडनेरा मार्गावरील जुना रेल्वे उड्डाण पूल असून, याठिकाणी नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा. महारेलने कामांचे प्राधान्यक्रमानुसार टप्पे पाडावेत. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हुडकोकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे. महारेलमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे देयक राज्य शासनाकडून तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news