पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गाजलेल्या सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून गोवा पोलिसांनी आरोपी पूजा नाईक हिच्यावर नार्को अॅनालिसिस चाचणी करण्यासाठी प्रथमश्रेणी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असता तिने या चाचणीसाठी संमती देण्यास स्पष्ट नकार देत घुमजांव केले आहे.
न्यायालय या अर्जावर काय निर्णय देते याकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे. संशयित पूजा नाईक हिने दोन सरकारी वरिष्ठ अधिकारी तसेच एका मंत्र्यांचा उल्लेख करत या सरकारी नोकरी घोटळ्यात सुमारे १७ कोटींचा व्यवहार झाल्याचा कथित आरोप केला होता.
जेव्हा तिचे हे आरोप फेटाळून लावण्यात आले तेव्हा तिने पोलिसांना तिची नार्को अॅनालिसिस चाचणी करावी त्यामुळे सत्य बाहेर येईल, असा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यावेळी ही चाचणी करण्यासंदर्भात सावधगिरीने पावले उचलली होती. मात्र जेव्हा या चाचणीसाठी पोलिसांनी अर्ज केला तेव्हा संशयित पूजा नाईक हिने स्वतःच त्याला नकार दिला आहे.
त्यामुळे तिने जे आरोप केले ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा ज्यांचे पैसे घेतले आहे त्यांच्याकडून होत अशलेल्या पैशांच्या मागणीतून अंग काढून घेण्यासाठी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच घोटाळ्याशी संबंधित तपशील उघड करण्यासाठी पोलिसांनी नार्को चाचणीची मागणी केली होती. तपास अधिक सखोल करण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले.
मात्र, भारतीय कायद्यानुसार नार्को अॅनालिसिस चाचणीसाठी संबंधित संशयिताची संमती आवश्यक असते. त्यामुळे पूजा नाईक हिने संमती नाकारल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
आणखी खुलासे होणार
दरम्यान, न्यायालय या प्रकरणावर पुढील सुनावणीत निर्णय घेणार असून पोलिस तपास सुरूच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोकरी घोटाळा प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.