फोंडा : पुढारी वृत्तसेवा
आशेवाडा बेतोडा - फोंड्यात एका भंगार अड्याला लागलेल्या आगीत सर्व भंगारासह इतर चीजवस्तू जळून खाक झाल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शनिवारी रात्री ३ च्या सुमारास लागली. भंगार अड्यात साठवून ठेवलेले प्लास्टिक, रबर तसेच लाकडी वस्तूंसह इतर सामान आणि वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आग आटोक्यात आणण्यासाठी ६ तास आणि २० पाण्याचे बंब लागले. फोंडा कुंडई जुने गोवे मडगाव पणजी व इतर ठिकाणाहून हे पाण्याचे बंब मागवण्यात आले. आशेवाडा येथे असलेल्या या भंगार अड्याला अचानक आग लागली.
भंगार अड्ड्यातील प्लास्टिकला ही आग लागल्यानंतर लगेच सर्वत्र पसरली. फोंडा अग्निशमन दलाला विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र आगीचे भयानक स्वरूप पाहता इतर ठिकाणच्या बंबांना पाचारण करण्यात आले.
तब्बल ६ तासांनंतर आग आटोक्यात आली. आग आग लागल्यावर भंगार अड्यात वास्तव्याला असलेल्या कामगारांनी बाहेर धाव घेतली. आग विझवण्यासाठी आलेल्या दलाच्या वाहनाना मोकळी जागा नसल्याने वाहने मागे पुढे घेताना मोठे त्रासदायक ठरले.
सुरक्षेच्या कारणावरून या अड्याच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना जवानांनी व पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यामुळे परिसर सुरक्षित राहिला. या भयानक आगीमुळे दोन वर्षांपूर्वी ढवळी मुख्य मार्गालगत लागलेल्या आगीचे स्मरण स्थानिकांना झाले. त्यावेळी त्या भंगार अड्याला १ कोटीचे नुकसान झाले होते.
भंगार अड्डा बेकायदा ?
या भंगार अड्नुयात कोणतीच अग्निरोधक उपकरणेच नसल्याचे स्पष्ट झाले. परप्रांतीय चालवत असलेल्या या भंगार अड्ड्यात अग्निरोधक उपकरणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य परवाने नसल्याने बेकायदेशीरपणे हा भंगार अड्डा चालवला जात असल्याने बेतोडा पंचायतीच्या सचिवाने संबंधिताला जी काही कागदपत्रे आहेत ती पंचायतीकडे सुपूर्द करावीत, अशी सूचना केली आहे. दरम्यान बेतोडा पंचायत क्षेत्रातील सर्व भंगार अड्यांची तपासणी करण्यात येईल आणि आवश्यक कागदपत्रे नसल्यास हे भंगार अड्डे सील केले जातील, असे सरपंचाने स्पष्ट केले आहे
केरी माळरानावर भीषण आग
काजू झाडे भस्मसात; लाखोंचे नुकसान हरमल : पुढारी वृत्तसेवा केरी पंचायत क्षेत्रातील माळरानावर आग लागल्याने काजू झाडे भस्मसात झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. वाळलेल्या गवतामुळे ही आग फैलावण्यास मदत झाली. मात्र, आग लागल्याचे नेमके कारण समोर आले नाही. शनिवार, दि. २१ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सदर आगीचा प्रकार घडला. परवा रात्रीही त्याच भागात आगीचा भडका उडाला होता.
मात्र, आग आटोक्यात आली. दि. २१ रोजी रात्री आग पुन्हा पसरल्याने बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्या भागातून अनेकदा पॅराग्लिडिंग वगैरे प्रकार चालू होते. मात्र, गेली दोन वर्षे सदर प्रकार बंद होते. या डोंगर माळरानावर पूर्वीकाळी काजू उत्पादक शेतकरी सकाळच्या वेळेत कापणी वगैरेची कामे करीत होती. मात्र, अलीकडे काजू उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले होते. त्या भागात पोचण्यासाठी रस्ता अवघड असून आगीचा प्रभाव डोंगरावरून खाली पसरल्यास लोकवस्तीत हाहाकार उडू शकतो, असे काहींनी बोलून दाखवले.