Ponda Chaturthi Matoli Bazar 
गोवा

Ponda Chaturthi Matoli Bazar | फोंड्यात यंदाचा चतुर्थीचा माटोळी बाजार 'वरच्या बाजारातच'; पालिका बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Ponda Chaturthi Matoli Bazar | गणेशोत्सवासाठी फोंडा पालिका सज्ज; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेणार

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
फोंड्यातील चतुर्थीचा बाजार यंदाही वरच्या बाजार भागातील रस्त्यावर भरणार असून, गोवा बागायतदार ते पालिका मार्केट संकुलपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार असून यासंबंधीचा निर्णय मंगळवारी (दि. १८) झालेल्या फोंडा पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला.

फोंडा नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला इतर नगरसेवक तसेच पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते. चतुर्थीचा माटोळी बाजार वरच्या बाजार भागात भरणार आहे. या बाजारात सहभागी विक्रेत्यांकडून सोपो कर घ्यायचा की नाही ते सरकारच्या निर्णयानंतर ठरवण्यात येईल. गेल्या वेळेला चतुर्थीच्या बाजारात सहभागी विक्रेत्यांचा सोपो कर मुख्यमंत्र्यांनी माफ केला होता. त्यामुळे यंदाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पालिका सभागृहात जनता दरबार; जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ऐकून घेतल्या समस्या

फोंडा पालिका सभागृहात मंगळवारी (दि. १८) पालकमंत्री या नात्याने जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जनता दरबार भरवला आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्याच अग्रक्रमाने चर्चेला आली. या जनता दरबारावेळी सर्व सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.


पाणी समस्येबरोबरच रस्ते, वीज, मलनिस्सारण जोडणी तसेच पदपूल, संरक्षक भिंत व इतर समस्याही नागरिकांनी मांडल्या. फोंडा तसेच इतर पंचायतक्षेत्रातील नागरिकांसह माजी नगराध्यक्ष तथा राजीव कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ दळवी, रूपक देसाई व इतरांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या.

दरम्यान, फोंडा तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी येत्या १५ दिवसांत कारवाई करण्याची गवाही सुभाष शिरोडकर यांनी दिली. विशेषतः गांजे येथील पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंबंधीही चर्चा मंत्र्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

पालिका क्षेत्रात नो पार्किंग संबंधी आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात येणार असून, त्यासंबंधीच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. सध्या वाहनचालक मन मानेल तशी वाहने बेशिस्तपणे पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातही होत असतात. त्यामुळे नो पार्किंगसाठी पालिका आग्रही आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय पालिका बैठकीत झाला. इतर अनेक विषयांवरही चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT