

खोपोली : ज्येेष्ठ साहित्यिक र.वा. दिघे यांचे खोपोली हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गतवर्षी खोपोलीमध्येच एका कार्यक्रमात केली होती. मात्र त्या बाबतचा शासन निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची मात्र अद्याप प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्थेकडून पुस्तकाचे गाव ही योजना राबवली जाते. महाराष्ट्रातील ज्या गावांमध्ये साहित्यिकांनी मोठे योगदान दिलेले आहे, उत्तम अशी साहित्यसेवा केलेली आहे अशा गावांना पुस्तकांचे गाव योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासनाचे धोरण आहे. खोपोली हे साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेले आहे. तसाच प्राचीन असा सांस्कृतिक व साहित्यिक वारसा आहे.
थोर साहित्यिक कै.र.वा. दिघे अर्थात रघुनाथ वामन दिघे यांना महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण कादंबरीकार म्हणून ओळखले जाते. मराठीतील सर्वच साहित्य प्रकारात उल्लेखनीय साहित्य निर्मिती करणारे साहित्यिक र.वा. दिघे हे खोपोलीचे प्रतिभावंत लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके, कविता असे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पाणकाळा, सराई, आई आहे शेतात, पड रे पाण्या या कादंबऱ्या मराठी साहित्यात मान्यताप्राप्त ठरल्या. त्यांच्या पाच कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले.
महात्मा गांधी यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड’ या नाटकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सहावे पारितोषिक मिळाले असून त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर लेखक म्हणून गौरव झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, शांताबाई शेळके, पानिपतकार विश्वास पाटील, कवी सतीश काळसेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अशा अनेक मान्यवरांनी दिघे यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.
र.वा.दिघे यांच्या साहित्यिक योगदानाची नोंद घेत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खोपोली नगरपरिषदेने र.वा. दिघे स्मारक व ग्रंथालय खोपोलीत सुरू केलेले असून त्या माध्यमातून खोपोलीत उत्तम प्रकारची वाचन संस्कृती जोपासली जाते. खोपोलीत व परिसरात विविध शाळा व महाविद्यालयातून जवळपास 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी खोपोलीला पुस्तकांचे गाव योजनेत समाविष्ट करणे आवश्यक वाटते. कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा खोपोलीला कार्यरत असून अनेक उत्तमोत्तम असे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम कोमसाप खोपोली शाखेतर्फे राबवले जातात.
काय आहे योजना
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी 2017 मध्ये राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने हा प्रकल्प सुरू केला. ब्रिटनमधील हे-ऑन-वे च्या धर्तीवर येथील घरे, शाळा व मंदिरात वाचन कट्टे उभारून त्यात हजारो पुस्तके विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पाचगणी दरम्यान असलेले भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. भिलार नंतर मालगुंड (रत्नागिरी), वेरूळ (छत्रपती संभाजीनगर), नवेगाव बांध (गोंदिया), पोंभुर्ले (सिंधुदुर्ग) आणि अंकलखोप (सांगली) यांसारख्या इतर गावांमधेही पुस्तकांचे गाव उभारले जात आहेत.
या योजनेद्वारे पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देताना साहित्यप्रकारांनुसार विविध विभाग केले जातात. प्रामुख्याने बालसाहित्य, संतसाहित्य, लोकसाहित्य, विज्ञान, इतिहास, कादंबरी, विनोदी साहित्य, शिवकालीन इतिहास, स्त्रीसाहित्य, दिवाळी अंक अशा विविध विभागांमध्ये पुस्तकांचे वर्गीकरण करण्यात येते. वाचकांनी पुस्तकांच्या दालनात येऊन स्वत पुस्तक काढावे आणि तेथेच बसून वाचन करावे, अशी साधी संकल्पना या प्रकल्पाची आहे. त्यासाठी वाचकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
खोपोलीकरांची शासनाकडे मागणी
पुस्तकांचे गाव योजनेमध्ये र.वा. दिघे यांच्या खोपोलीचा समावेश करावा असा प्रस्ताव कोमसाप शाखा खोपोली तसेच साहित्यिक, लेखक, कवी, शिक्षक, विचारवंत, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांनी निवेदनाद्वारे मराठी भाषा मंत्री सामंत यांच्याद्वारे शासनाला सादर केलेला आहे. खोपोलीला पुस्तकांचे गाव योजनेत समाविष्ट करून या शहराचा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जपून तो अधिक वृद्धिंगत होण्यासाठी खोपोली गावाची या योजनेसाठी निवड व्हावी, अशी विनंती शासनाकडे करण्यात आलेली आहे.
सर्व दृष्टिकोनातून खोपोलीचा ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेत समावेश झाल्यास र.वा. दिघे यांच्या साहित्यिक योगदानातून समृद्ध झालेल्या खोपोलीचा साहित्यिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अधिक विकास व्हायला मदत होईल.
सौ.उज्वला वामन दिघे, साहित्यिक व र.वा.दिघे यांच्या स्नुषा, माजी अध्यक्षा, कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली.