Subhash Shirodkar  
गोवा

Subhash Shirodkar | फोंडा जनता दरबारात नागरी समस्यांचा स्फोट; मंत्री सुभाष शिरोडकरांसमोर पाणीप्रश्नासह अडचणींचा पाढा!

Subhash Shirodkar | जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
फोंडा मतदारसंघात गेल्या दहा महिन्यांपासून आमदार नसल्याने अनेक विकासकामांना 'खो' बसला असून, नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी फोंड्यात जनता दरबार सुरू केल्याने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी फोंडा पालिका सभागृहात आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या जनता दरबारात पाणीप्रश्नासह अनेक समस्यांचा पाढा नागरिकांनी मंत्री शिरोडकर यांच्यासमोर वाचला. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची सूचना शिरोडकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
या जनता दरबाराला मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या समस्या थेट मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

फोंड्यात सध्या पाणीप्रश्न गंभीर झाला असून, बहुतांश नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी मांडल्या. काही भागांत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय खराब रस्ते, वीजपुरवठा, गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, संरक्षक भिंतींचे बांधकाम आणि तळी दुरुस्तीच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. मलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित समस्या तसेच इतर नागरी सुविधांबाबतही नागरिकांनी मंत्री शिरोडकर यांचे लक्ष वेधले. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची नोंद घेऊन मंत्री शिरोडकर यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जनतेला थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी (चौकट)

फोंडा मतदारसंघात आमदार नसल्याने नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना थेट मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT