Crime News File Photo
गोवा

Ponda Crime News | पैशांच्या पावसामुळे महिला कंगाल; दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 22 लाखांना गंडा घालणारी कोल्हापुरात जेरबंद

Ponda Crime News | कर्जत-रायगडमधील महिलेकडून कुर्टी-फोंड्यातील महिलेची फसवणूक; फोंडा पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

फोंडा (पुढारी वृत्तसेवा): तंत्रमंत्राच्या आधारे कोणतीही अडलेली कामे झटपट करून देणे आणि पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील एका भामट्या महिलेने गोव्यातील कुर्टी-फोंडा येथील एका महिलेची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित महिला रूपाली सुनील पवार (वय ४६, रा. कर्जत, रायगड, महाराष्ट्र) हिने कुर्टी येथील तक्रारदार महिलेशी संपर्क साधून हा विश्वासघात केला. हा प्रकार गेल्या ऑगस्ट महिन्यात घडला होता.
गोव्यातील कुर्टी-फोंडा येथील एक पापभीरू महिला भामट्या रूपालीच्या संपर्कात आली असता, तिने आपण तंत्रमंत्राच्या साहाय्याने पैसे दुप्पट करून देते अशी थाप मारली. या अंधश्रद्धेच्या आणि लालसा दाखवणाऱ्या आमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने आयुष्यभराची आपली पुंजी असे एकूण २२ लाख रुपये रूपालीच्या स्वाधीन केले.

रूपालीने कुर्टी येथील घरातच खोटे तंत्रमंत्र करून तक्रारदार महिलेला भुलवले आणि पैसे घेऊन पोबारा केला. आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने फोंडा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास करत भामट्या रूपालीच्या मोबाईल क्रमांकावरून तिचा ठावठिकाणा शोधून काढला.

संशयित महिला कोल्हापुरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी तातडीने कोल्हापुरात धाव घेत तिला जेरबंद केले आणि रीतसर अटक केली. रूपाली हिचे फसवणुकीचे अनेक धंदे असून तिने वशीकरण करण्याचे तंत्र विकसित केल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फोंडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT