फोंडा : पुढारी वृत्तसेवा
फोंडा पालिकेचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते रॉय नाईक यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने फोंड्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.
राजीनामा पत्र गुरुवारी पालिका प्रशासकांकडे सादर करण्यात आले असून, त्याची एक प्रत मुख्याधिकाऱ्यांकडेही देण्यात आली आहे. राजीनामा मागे घेण्यासाठी रॉय नाईक यांना सात दिवसांची मुदत आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहेत. निर्धारित मुदतीत राजीनामा मागे न घेतल्यास प्रभाग क्रमांक १ मध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
२०२३ मध्ये झालेल्या फोंडा पालिका निवडणुकीत रॉय नाईक प्रभाग क्रमांक १ मधून बहुमताने निवडून आले होते. त्यांचे वडील रवी नाईक हे फोंड्याचे आमदार तसेच राज्याचे कृषिमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात प्रभागात विविध विकासकामे झाली होती. मात्र, रवी नाईक यांच्या निधनानंतर पालिकेतील विकासकामांना काही प्रमाणात खीळ बसल्याची चर्चा होती.
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या वेळी रॉय नाईक यांनी उमेदवारीसाठी आपणही इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यांचे बंधू रितेश हे भाजपच्या उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असताना रॉय यांनी व्यक्त केलेली इच्छा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर मडकई मतदारसंघातील विविध भागांत रॉय नाईक यांच्या नावाचे शुभेच्छा फलक झळकल्यानेही राजकीय चर्चेला उधाण आले होते.