फोंडा : फोंडा तालुक्यात डेंग्यू काही अंशी नियंत्रणात असला तरी डेंग्यूचा धोका अजून कमी झालेला नाही. त्यामुळे घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका आणि स्वच्छता ठेवा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे केले जात आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी फॉगिंग करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, फोंड्यातील गेल्या सहा वर्षांची डेंग्यू मृत्यूची आकडेवारी पाहिली तर दर दोन वर्षांनी एकजण डेंग्यूला बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या थंडी तापाचे रूण वाढले असून सरकारी आणि खासगी दवाखान्यात हेच रुग्ण जास्त संख्येने वाढत आहेत. विशेष म्हणजे अशा रुग्णांत लहानापासून ज्येष्ठ नागरिकांचा भरणा जास्त आहे.
मागच्या काळात बेतोडा, खडपाबांध, कुर्टी तसेच माशेल आदी भागात डेंग्यू रुग्ण वाढले होते. फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळात तर डेंग्यू रुग्ण सातत्याने वाढले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर खासगी आणि सरकारी पातळीवर फॉगिंग तसेच इतर उपक्रम हाती घेण्यात आले.
सध्या डेंग्यू नियंत्रणात असला तरी फोंड्यावरचा धोका अजून टळलेला नाही. स्वच्छतेसंबंधी जनजागृती आवश्यक आहे. आरोग्य खाते तसेच शाळा विद्यालयातून यासंबंधीचे उपक्रम तसेच मोहिमा आखायला हव्यात.
- सूरज माधव गावकर, ढवळी-फोंडा
आरोग्य खात्याने डासांचा नायनाट करण्यासाठी आधी आवश्यक त्या ठिकाणी फॉगिंग करणे गरजेचे आहे. जेवढी स्वच्छता राखाल तेवढी रोगराई दूर राहील.
- व्यंकटेश शिवराम नाईक, कुर्ती - फोंडा
नागरिकांनी घ्यायची खबरदारी
घर व बागायती परिसरात करवंट्या तसेच टायर व इतर वस्तूत पावसाचे पाणी साचू देऊ नका
परिसरात स्वच्छता ठेवा
उघड्या पिंपात पाणी साठवून ठेवू नका
उघड्यावर शिंकू किंवा खोकू नका
आतापर्यंतचे डेंग्यू मृत्यू
२०२६ - विभा तिवारी खडपाबांध
२०२४ - दीपक साहू माशेल
२०२१ - सेजल नाईक कुर्टी
२०१८ - प्रेमा जल्मी मंगेशी