Goa Ponda Bye-poll
पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे ज्येष्ठ पूत्र रितेश नाईक यांना जाहीर झाली आहे. दिल्लीतून रितेश नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे आम आदमी पक्षानेही गितेश नाईक यांचे नाव फोंडा पोटनिवडणूकीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कॉंग्रेसने डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे.
आरजी पक्ष आपला उमेदवार उतरवणार आहे, तसेच माजी मंत्री मिकी पाशेको यांनीही आपण उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार आहे.
विरोधकांनी भाजपला हरवण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याची जी घोषणा केली होती ती फोल ठरली असून काँग्रेसने डॉ. केतन भाटकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम आदमी पक्षाने बुधवारी फोंडातील गीतेश नाईक यांना आप मध्ये प्रवेश देऊन फोंड्याचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे. त्यामुळे फोंडा विधानसभा पोट निवडणुक बहुरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्षात असलेला आरजी पक्षही आपला उमेदवार फोंड्यात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे फोंड्यात भाजपच्या विरोधात तीन ते चार उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक हे मंगळवारी दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बुधवारी दिल्लीला जाणार असल्याची चर्चा होती मात्र ते गोव्यातच आहेत. नाईक यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु केली असून गुरुवारी भाजपचा उमेदवार घोषीत होऊ शकतो.
भाजपच्या फोंडा उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांचे नाव आघाडीवर होते. विश्वनाथ दळवी यांचेही नाव भाजपतर्फे दिल्लीला पाठवण्यात आले होते. तरी गोव्यातील भंडारी समाजाची मागणी आणि रवी नाईक यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढत सहानुभूती मिळवण्यासाठी भाजप रितेश नाईक यांनाच उमेदवारी दिली आहे.
फोंडा मतदारसंघांमध्ये 2022 च्या निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार म्हणून डॉ.केतन भाटीकर यांनी भाजपचे उमेदवार रवी नाईक यांना चांगली टक्कर दिली होती. अवघ्या 70 मतांनी ते पराभूत झाले होते. फोंडा मतदारसंघात मगोची भरीव मते आहेत. मगो पक्षाने भाजपला यापुर्वीच पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे भाजप व मगोची मते एकत्र आल्यास भाजप उमेदवाराचा विजय निश्चीतआहे. दुसरीकडे विरोधकांची मते विभागण्याची शक्यता आहे.
आरजीची नजर 2027 वर
आर जी पक्ष फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. मात्र त्यांची नजर 2027 च्या निवडणुकीवर असून त्या निवडणुकीत काँग्रेस आरजी सोबत युती करुन किमान 8 जागा देत असल्यास फोंडा पोटनिवडणुकीत आरजी पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यसाठी आरजी पक्ष काँग्रेसच्या प्रस्तावाकडे लक्ष देऊन वेळ काढत असल्याचे कळते.