Goa Assembly Election 2027 pudhari photo
गोवा

Goa Assembly Election 2027 : फोंडा मतदारसंघात आमदारकीसाठी रस्सीखेच

सहा प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू; इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : गेले दहा महिने आमदाराविना असलेल्या फोंडा मतदारसंघात या वेळेला आमदारकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. येत्या पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या भाजप, काँग्रेस, मगो, आप आणि आरजीपी तसेच गोवा फॉरवर्ड या सहा प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कुणाला तिकीट मिळते आणि कुणाला आमदारकी मिळते ते येणारा काळच सांगू शकणार आहे. मात्र भाजप, काँग्रेस आणि मगो या तीनच पक्षांत खरी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसते आहे.

फोंड्याचे दिवंगत आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फॉड्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळेला मगोचे समर्थन लाभलेले भाजपचे उमेदवार रवी पुत्र रितेश नाईक व काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्यातच खरी लढत होती. मात्र ऐनवेळेला निवडणूकच रद्द झाली आणि टपाली मतदानाची आकडेवारीही गुलदस्त्यात राहिली. नंतरच्या काळात काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांचे निधन झाले आणि राजकीय समीकरणच बदलले.

सद्यस्थितीत राजेश वेरेकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी आपल्या कामाला जोरात प्रारंभ केला आहे. भाजपतर्फे येत्या विधानसभा निवडणुकीत दोन प्रमुख दावेदार असून, त्यात रितेश नाईक व विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांचा समावेश आहे. दोन्ही उमेदवार मातब्बर असून, दोघांचेही जोरात काम सुरू आहे.

तरीपण कुणा एकाला भाजपने उमेद्वारी दिली तरी बंडाळी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्यांसमोर हा मोठा प्रश्न आहे. मागच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाकडून गितेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता काँग्रेस, आप तसेच इतर विरोधी पक्षाची युती झाली नाही तर आपकडून गितेश नाईक निश्चित आहेत.

एकंदरीत फोंडा, तसेच कुर्टी खांडेपार भागातील ३२ हजार मतदार फोंड्याचा आमदार ठरवणार असून, प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न

फोंडा मतदारसंघात एकूण ३२ हजार मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न संभाव्य उमेदवारांनी सुरू केले आहेत. भाजप, काँग्रेस, आप आणि मगो अशा चार राजकीय पक्षांकडून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांकडून पैशांची सध्या उधळपट्टी सुरू आहे. गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी सध्या कुंपणावर असून, त्यांची नेमकी कृती नंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीचे एकंदरित चित्र पाहता खरी लढत ही भाजप, काँग्रेस आणि मगो पक्षातच होणार आहे हे नक्की...

मगोचे फोंड्यात कार्य सुरू...!

मगो पक्षाने फोंड्यात आपले कार्यालय सुरू करून आपणही रेसमध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार लवू मामलेदार निवडून आले होते. मगो पक्षाची फोंडा मतदारसंघात बऱ्यापैकी मते असून, केतन भाटीकर हे मगोचेच उमेदवार होते. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत केतन माटीकर यांनी मगोची साथ सोडत काँग्रेसचा हात पकडला होता. तरीपण मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात फॉंड्यात असून, भाजप - मगो युती झाली नाही, तर मगो आपला उमेदवार फॉड्यातून उतरवेल हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT