मडगाव प्रदूषणाची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते शोहेल फुर्तादो व स्थानिक ग्रामस्थ 
गोवा

Goa Varca hotel sewage pollution| वार्का येथे हॉटेलच्या सांडपाण्यात गंभीर प्रदूषण

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने चिंता वाढली : हॉटेलवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : सासष्टी तालुक्यातील किनारपट्टी भागात हॉटेलमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच, वार्का येथील एका हॉटेल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यात जैविक आणि रासायनिक प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत जास्त आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाणी नमुना तपासणी अहवालामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच संबंधित ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने घेतले होते. या तपासणीत जैविक व रासायनिक प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याचे सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शोहेल फुर्तादो आणि वार्का पेडा येथील ग्रामस्थांनी संबंधित हॉटेलवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शोहेल फुर्तादो यांनी सांगितले की, पाण्याच्या नमुन्यांमध्ये बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) तब्बल १,२५० मिलीग्रॅम प्रति लिटर नोंदविण्यात आली आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यासाठी हे प्रमाण साधारणतः २५ मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असणे अपेक्षित असते. त्यामुळे आढळलेले प्रमाण हे सुमारे ५० पट अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.

केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) २,५०० मिलीग्रॅम प्रति लिटर इतकी नोंदविण्यात आली असून, मान्य मर्यादा १२५ मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असते. त्यामुळे हे प्रमाणही सुमारे २० पट अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय पाण्यातील निलंबित घन पदार्थाचे प्रमाण ५३९ मिलीग्रॅम प्रति लिटर आढळले असून, ते निर्धारित ३५ मिलीग्रॅम प्रति लिटर मर्यादेपेक्षा जवळपास १५ पट अधिक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बीओडी आणि सीओडीची इतकी उच्च पातळी ही नैसर्गिक पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणारी नसून अशुद्ध किंवा प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे मिश्रण असल्याचे स्पष्ट संकेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नाले, भूजल, शेतजमिनी आणि किनारी पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तपासणी अहवालात ई. कोलाई जिवाणूंचे प्रमाण १०० मिलिलिटरमागे ७८० एमपीएन इतके नोंदविण्यात आले आहे. सामान्यतः आंघोळीसाठी सुरक्षित पाण्यात हे प्रमाण २५० एमपीएन प्रति १०० मिलिलिटरपेक्षा कमी असणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

प्रदूषण तातडीने रोखण्याची मागणी...

रहिवाशांच्या मते, परिसरातील नाल्यांमधून येणारा तीव्र दुर्गंध, पाण्याचा बदललेला रंग आणि वाढते प्रदूषण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रदूषण तातडीने थांबवून किनारी पर्यावरणाचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT