

जुलैपासून वाहतूक नियमांची कडक झाली. दंड वाढले, एआय कॅमेरे बसले आणि नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाईही होत आहे. सीट बेल्ट नसला, हेल्मेट नसेल किंवा वाहन चालवताना मोबाईल वापरला, तर दंड अटळ. एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात छत्री आणि अशा स्थितीत त्याच वेळी वाहने थांबवणारे-सोडणारे काही वाहतूक पोलीस दिसले की, एआय कॅमेऱ्यालाही कदाचित संभ्रम पडत असेल ! मग एआय कॅमेऱ्याची नजर या दृश्याकडे वळत नाही का? की कॅमेऱ्यालाही गणवेश ओळखता येतो, अशी संतापाची लाट नागरिकांमध्ये उठत आहे. नियमांचे पालन करून घेणाऱ्यांनीच नियमांचे आदर्श उदाहरण घालून दिले, तर जनतेतही त्याबद्दल अधिक विश्वास निर्माण होईल. अन्यथा, दंड फक्त जनतेसाठी आणि सूट अधिकाऱ्यांना असे झाल्यास कल्याण म्हणावे लागणार त्या नियमांचे.
पुरस्कारांचे कवित्व
गोव्यात अनेकदा साहित्यिक पुरस्कारांबद्दल वाद होत असतात. कोण हे पुरस्कार विकत घेतो, कोण वशिला लावून पुरस्कार पटकावतो याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. काही साहित्यिक तर आपल्याला अमुक संस्थेकडून पुरस्कार देण्यासाठी पाठवलेल्या अटी-शर्थीची जंत्रीच सोशल मीडियावर जाहीर करतात. आणि आठवड्याभरात तोच पुरस्कार कोणाला तरी मिळाल्याचे वृत्तपत्रांत जाहीर झाल्यावर संबंधिताची अडचण होते. ते कमी होते म्हणून की काय आता राजकीय पुरस्कारांबाबतही वाद होत आहेत. हा पुरस्कार अधिकृत आहे की नाही हा वेगळा विषय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर असा पुरस्कार आपल्या माणसाला मिळतो याचे कौतुक व्हायला नको काय ?
कुवेत नाही, आता इंग्लंड न्यू नॉर्मल
पूर्वी गोमंतकीय उठसूट कुवेतला, सौदीला, आबुधाबीला जात. सध्या इराणने सगळी क्षेपणास्त्रे या भागातील अमेरिकी लष्करी तळांवर रोखलेली आहेत. त्यामुळे गोमंतकीयांनी आपला मोर्चा बहुदा आता इंग्लंडकडे वळवला आहे. काही महिन्यांपूर्वी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांची लंडनवारी गाजली होती. त्यांनी तेथील गोमंतकीयांच्या भेटी घेतल्या, काही मुलाखती दिल्या. आता गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यूके दौऱ्यावर असून त्यांनीही तेथील गोमंतकीयांच्या भेटीगाठी घेतल्या. दुहेरी नागरिकत्वाचे मधाचे बोटही त्यांनी दाखवले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचीही बरीच चर्चा झाली. ते १५ दिवस तेथे असतील. इंग्लंडच्या थंड वातावरणात डोके थंड करून बहुदा ते नव्याने गोव्यातील निवडणुकांच्या तयारीला लागणार आहेत.
गोवा फॉरवर्डच्या निर्णयाची प्रतीक्षा
काँग्रेस गोवा फॉरवर्डच्या युतीबाबत पुढे काही झालेले नाही. २०२७ पर्यंत आपण काँग्रेससोबत असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले होते. पण या युतीला एक्स्टेन्शन देण्याबाबत काँग्रेसमध्ये काही चलबिचल असावी असे दिसते. काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल गोवा दौऱ्यावर येऊन गेले. त्याच दरम्यान ५ जुलैला विजय सरदेसाई यांना भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अखेरपर्यंत त्यांच्याशी काही संपर्क करण्यात आला नाही. अखेर ते स्वतःला शांत करण्यासाठी १५ दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर निघून गेले. विजय सरदेसाई यांनी गुढी पाडव्यालाच एकला चलोची घोषणा केली होती. तरीही त्यांनी बऱ्यापैकी वाट बघितली. आता इंग्लंडवरून परतल्यावर ते काय निर्णय घेतात याकडे लोकांचे लक्ष लागन राहिले आहे.
दत्तप्रसाद नाईक काँग्रेसच्या वाटेवर
ताळगाव मतदारसंघामधून पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू आहे. त्या दिशेने त्यांनी ताळगावातील लोकांना भेटण्यास तसेच संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. भाजपमधून फारकत घेतलेले दत्तप्रसाद नाईक हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. सध्या ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यालयात अधूनमधून दिसतात. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत काही ताळगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपमध्ये डाळ न शिजल्याने काँग्रेसची वाट धरणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी होत आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारी दत्तप्रसाद नाईक यांना ताळगावमधून मिळेल का याबाबत शंका आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे काहीसे झुकते माप त्यांना मिळू शकते.
भाजप आता गप्प का?
अयोध्या येथील राम मंदिरातून भक्तांनी दिलेले दान कर्मचाऱ्यांनीच चोरल्याचे उघड झाले आहे. कर्मचाऱ्यांनी नोटांच्या बंडलांमधून कोट्यवधी रुपयांची चोरी केली असून, सुरुवातीच्या टप्प्यात ८ संशयितांच्या घरांवर छापे टाकून ७९ लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. २७ एप्रिल ते ५ जून २०२६ दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांनी नोटा चोरल्याचे ७० पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. पैशांची मोजणी करताना सुरक्षेचे कडक नियम शिथिल केल्यामुळे ट्रस्टचे माजी सदस्य अनिल मिश्रा यांच्यावरही संशयाची सुई आहे. एवढे सगळे घडूनही राम मंदिराचे श्रेय घेणारा राज्यातील भाजपचा एकही नेता किंवा कार्यकर्ता याबद्दल ब्र देखील काढत नाही. अयोध्या मंदिर उभारणीचे श्रेय घेणाऱ्या भाजपने आता या चोरी प्रकरणाची जबाबदारी घ्यावी किंवा किमान चोरी करणाऱ्यांचा निषेध तरी करावा, अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत. विरोधकांच्या विरोधात गावागावात, तालुक्यात सगळे नेते, भाजपचे महिला-पुरुष कार्यकर्ते एखाद्या मुद्द्यावरून रान उठवताना दिसतात. मात्र, आता ते मूग गिळून का बसलेत ? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
फातोर्थ्यात काय होणार ?
विधानसभा निवडणुका जवळ येताहेत तशी विविध मतदारसंघातील समीकरणांबद्दल उत्सुकता वाढते आहे. फातोर्थ्यात मागच्या वेळी विजय सरदेसाई काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीचे उमेदवार होते. यंदा त्यांनी स्वतंत्र जायचे ठरवल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वेळी फार कमी फरकाने ते निवडून आले होते. मी प्रदेशाध्यक्ष असूनही फातोड्र्ध्यातून मला उमेदवारी मिळेल की नाही हेही सांगता येत नाही असे विधान दामू नाईक यांनी केले असले तरी ते फातोर्थ्यातून इच्छुक आहेत. यावेळी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचे वजनही वाढलेले आहे. त्यामुळे आपण बाजी मारू शकू असे त्यांना वाटत असल्यास नवल नाही.
न्यायपालिकेचे पावित्र्य राखायला हवे
गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात व इतर काही न्यायालयांत न्यायाधीशांना उद्देशून टिप्पणी करणे, शाई फेकणे या गोष्टी वाढलेल्या आहेत. पूर्वी न्यायालयात ज्येष्ठ वकील मंडळी एक डेकोरम पाळत. काही न्यायाधीशांशी वकिलांचे वितुष्ट असू शकते, पटत नसते पण त्याचा परिणाम ते कामकाजावर होऊ देत नसत. मात्र अलीकडे हा संयम, विवेक कुठे तरी सुटलेला आहे. परवा एका प्रकरणात थेट संबंध नसतानाही एका वकिलाने सरन्यायाधीशांना उद्देशून काही टिप्पणी केली. तेव्हा सरन्यायाधीश तिथे उपस्थितही नव्हते. आपण किमान आपल्या न्यायपालिकेचा आदर केला पाहिजे. सुदैवाने सरन्यायाधीशांनी काही कारवाई केली नसली तरी त्यांचा संयम हा कमकुवतपणा असल्याचे गृहीत धरू नये. सरन्यायाधीशांकडे न्यायालयीन कामकाजाचे पालक म्हणून एक जबाबदारी असते. त्यांची ही कृती कौतुकाचा विषय ठरली आहे
वन नेशन, वन इलेक्शन
वन नेशन, वन इलेक्शनला देशभरात पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेतेही याला अनुकूल आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी याला विरोध केला असला तरी तो राजकीय विरोध आहे. जवळपास २० टक्के राजकीय पक्षांनी याला अनुकूलता दर्शवल्याचे संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांचे म्हणणे आहे. शिवाय पक्षांतरांवर किंवा विश्वास, अविश्वास ठरावांवरही कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. सुदिन ढवळीकर यांना हे ऐकून बरे वाटेल. कारण त्यांनीही याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती.
जय हरी विठ्ठल...
गोव्यातून दिंडीपथके पंढरपूरकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक पथके प्रस्थान करताना तिथे राजकारण्यांनी उपस्थिती लावली आहे. काही अंतर दिंडीबरोबर चालून नंतर त्यांना निरोप देण्याचे काम ते करत आहेत. आतापर्यंत पणजीत झालेल्या कीट वाटप सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सदानंद तानावडे, प्रवीण आर्लेकर, बाबू कवळेकर, देविया राणे यांनी सहभाग घेतला. तसेच विविध ठिकाणाहून निघालेल्या वारींना निरोप देण्यासाठी रमेश तवडकर, दाजी साळकर, दीपक ढवळीकर, गोविंद गावडे, युरी आलेमांव उपस्थित होते. सध्या गोव्याचे वातावरण आषाढीमय झाले असून सर्वांच्या मुखी जय हरी विठ्ठलाचा जप सुरू आहे.