gram panchayat election 
गोवा

Goa Panchayat Politics | "तोरसे पंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव"

Goa Panchayat Politics | तोरसे पंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव

पुढारी वृत्तसेवा

पेढणे : पुढारी वृत्तसेवा

तोरसे ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडली असून उपसरपंच उत्तम वीर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीतील सर्व सहा सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याने उपसरपंचांवरील नाराजी उघडपणे समोर आली असून या घडामोडीमुळे गावाच्या तसेच पेढणे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीतील सत्ता समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वीर यांची बाबू आजगावकर यांच्याशी वाढलेली जवळीक भोवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अविश्वास ठरावावर सरपंच पूजा साटेलकर यांच्यासह पंच रमेश बुटे, आत्माराम तोरसकर, प्रार्थना मोटे, स्वाती तोरसकर आणि छाया शेट्ये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतल्याने अंतर्गत मतभेद टोकाला पोहोचल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात ग्रामपंचायतीच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावातील राजकीय वर्तुळात उपसरपंच उत्तम वीर यांची बाबू आजगावकर यांच्याशी असलेली कथित राजकीय जवळीकही चर्चेचा विषय ठरली आहे.

या राजकीय समीकरणांमुळे ग्रामपंचायतीतील वातावरण बिघडल्याचे काही नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून बोलले जात असले, तरी या दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

वीर यांची भूमिका अद्यापही अस्पष्ट

दरम्यान, या प्रकरणी उपसरपंच उत्तम वीर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नियमानुसार आता अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर उपसरपंच पदावर ते कायम राहणार की त्यांना पद गमवावे लागणार, हे स्पष्ट होणार आहे. या मतदानाकडे तोरसे ग्रामपंचायतीसह संपूर्ण पेढणे तालुक्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवस स्थानिक राजकारणात घडामोडींची चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT