Girish Chodankar Goa 
गोवा

Goa Congress Girish Chodankar | पक्षांतर हीच राजकारणातील यशाची नवी परिभाषा

फुटिरांना तिकिटे देणार नाही, पैशांच्या बळावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना उमेदवारी नाही अशा घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

फुटिरांना तिकिटे देणार नाही, पैशांच्या बळावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना उमेदवारी नाही अशा घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्या आहेत. घोषणा आकर्षक असल्या तरी त्याची अंमलबजावणी कठीण आहे. नवीन नेते तयार करण्याची प्रक्रिया कधीच थांबली आहे. आहेत तेच नेते, त्यांचीच घराणी, त्यांचेच सगेसोयरे राजकारणात आहेत. अशा वेळी या घोषणांना काही अर्थ नाही. आणि पैसा असल्याशिवाय निवडणुका लढवण्याचा विचारही कुणी करू शकत नाही. सत्य हे आहे की भारतीय राजकारणात पक्षांतर हीच यशाची नवी परिभाषा झाली आहे.

पक्षांतर हीच राजकारणातील यशाची नवी परिभाषा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेल्या घोषणेचे मगोचे नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले आहे. गोव्यात सुदिन ढवळीकर हे एकमेव असे नेते आहेत जे वारंवार पक्षांतरांविषयी आवाज उठवतात. निवडणूक आयोगापासून, राष्ट्रपती ते न्यायालयांपर्यंतचे दरवाजे ठोठावून त्यांनी पक्षांतरांवर बंदी यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना तसा नैतिक अधिकार आहे.

कारण गेली ३० वर्षे त्यांनी कधी पक्ष बदललेला नाही. भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कधी पक्षांतर केले नाही. एवढेच नाही तर पक्षांतर करण्याचा विचार स्वप्नातही केला नाही. राजकारणातील ही प्रजाती आता दुर्मीळ होत चालली आहे. भाजपातील नेते पक्षांतर करत नाहीत हे खरे असले तरी अनेक राज्यांत त्यांनी पक्षांतरांना ‘फॅसिलिटेट’ केले आहे. त्यामुळे त्यांना पूर्णत: निर्दोष घोषित करता येणार नाही.

इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांची चांदीच चांदी झालेली आहे. अनेक जण मुख्यमंत्री झाले आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी. मूळ पक्षापासून फुटून वेगळे गट करणारेही सत्तेचे लाभार्थी ठरलेले आहेत. मग ते शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे व इतर आमदार असोत किंवा अजित पवार/सुनेत्रा पवार व इतर आमदार असोत.

राजकारणात ‘उपद्रव’ हे महत्त्वाचे ‘मूल्य’ मानले गेले आहे. त्या बळावर गोव्यात विल्फ्रेड डिसोझा, दयानंद नार्वेकर, सोमनाथ जुवारकर, सुरेश परुळेकर अशा लोकांनी पक्षांतर्गत राजकारणात नेहमी कुरघोडी केली. चर्चिल आलेमांव, बाबूश मोन्सेरात, मिकी पाशेको, रवी नाईक यांनी पक्षांतरे करून राजकारणात यश मिळवले. ९० च्या दशकात फूट, पक्षांतरे, बंडखोऱ्यांनी गोव्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. मूळ आयाराम गयाराम शब्दप्रयोगही झाकोळला गेला होता.

१९६७ साली हरियाणातील आमदार गया लाल यांनी पंधरवड्यात तीन वेळा पक्ष बदलला आणि ‘आया राम, गया राम’ हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणाच्या शब्दकोशात कायमचा रुजला. तेव्हा पक्षांतर म्हणजे नैतिक अध:पतन मानले जायचे. मात्र १९८० नंतर, विशेषतः गेल्या दशकभरात, पक्ष बदलणे हा अपवाद न राहता सत्ताकारणाचे प्रभावी हत्यार बनले आहे. आकडेवारी सांगते की २०१६ ते २०२० या काळात पक्ष बदलून पुन्हा निवडणूक लढवलेल्या नेत्यांपैकी ८९ टक्के जणांना नव्या पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यातील ७० टक्के जण निवडूनही आले. अनेक जण थेट मंत्रिपदापर्यंत पोहोचले. या प्रक्रियेत सर्वाधिक फायदा भाजपला झाला, तर सर्वाधिक तोटा काँग्रेसला सहन करावा लागला.

काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन प्रचंड यश मिळवलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. आसाममध्ये तरुण गोगोई सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणारे हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ साली भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या सहा वर्षांत ते आसामचे मुख्यमंत्री झाले आणि आज ईशान्य भारतातील भाजपच्या विस्ताराचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मध्य प्रदेशात राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मार्च २०२० मध्ये २२ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या या निर्णयाने कमलनाथ सरकार कोसळले आणि सिंधिया केंद्रात नागरी उड्डाण व नंतर पोलाद मंत्री झाले. आज ते दळणवळण मंत्री आहेत. मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंग यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येत २०१७ साली पक्षाला बहुमत मिळवून दिले. त्रिपुरात काँग्रेसमधून आलेले मानिक साहा २०२३ मध्ये मुख्यमंत्री झाले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे एकेकाळचे उजवे हात असलेले सुवेंदू अधिकारी २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले आणि २०२६ च्या निवडणुकीत तृणमूलला पराभूत करून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटकात २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीएसच्या १७ आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कुमारस्वामी सरकार पडले आणि पोटनिवडणुकीत यापैकी ८० टक्के आमदार पुन्हा निवडून आले, त्यातील १२ जणांना मंत्रिपद मिळाले.

ही अगदी अलीकडची उदाहरणे. त्यापूर्वी शरद पवार यांनी १९७८ मध्ये ३८ आमदारांसह काँग्रेस फोडून जनता पार्टीच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावरून पुन्हा काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. या पक्षाने पुढील दशकभर काँग्रेससोबत सत्तेत राहून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली. अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू यांनी सहा महिन्यांत काँग्रेसमधून प्रादेशिक पक्षात आणि तिथून भाजपमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्रिपद मिळवले.

काँग्रेसमधून किंवा इतर पक्षांतून भाजपात आलेल्या, वेगळी चूल मांडलेल्या नेत्यांना निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. यातील अनेक जण अनपेक्षितपणे मुख्यमंत्री वगैरे झाले आहेत. याउलट भाजपमधून इतर पक्षात जाऊन मोठे यश मिळवलेले नेते अपवादानेच आढळतात. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे त्यातील एक. भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर २००७ ते २०१२ या काळात ते मुख्यमंत्री झाले. तेलंगणात रेवंत रेड्डी यांनी अभाविप आणि तेलगू देसमची पार्श्वभूमी असूनही २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अवघ्या चार वर्षांत प्रदेशाध्यक्ष झाले आणि २०२३ मध्ये मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी १९९६ मध्ये भाजप सोडला, राष्ट्रीय जनता पार्टी काढली आणि नंतर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये त्यांना मोठे स्थान मिळाले, पण गुजरातमध्ये पक्षाला सत्ता मिळवून देता आली नाही. महाराष्ट्रात नाना पटोले यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर खासदारकी जिंकली, २०१७ मध्ये राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष झाले, पण राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यात यश आले नाही.

या सर्व उदाहरणांमागचे राजकीय गणित स्पष्ट आहे. पक्षांतरांशिवाय तरणोपाय नाही. राजकारणात पुढे जायचे असेल तर उपद्रवमूल्य वाढवले पाहिजे आणि पक्षांतर केले पाहिजे. एडीआरच्या अहवालानुसार २०१४ ते २०२१ दरम्यान पक्ष बदललेले ३५ टक्के आमदार-खासदार काँग्रेसमधून होते, तर ३५ टक्के नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून काँग्रेसला आपली ‘फीडर सिस्टीम’ बनवले आहे. सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यास तिकीट, निवडणूक निधी, संघटनात्मक पाठबळ आणि मंत्रिपदाची शक्यता वाढते. त्यामुळे महत्त्वाकांक्षी नेते काँग्रेसमधून भाजपकडे वळतात आणि यशस्वी होतात. याउलट भाजपमधून बाहेर पडणाऱ्याला संघटनात्मक पाठबळ मिळत नाही, मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते विरोधात जातात आणि सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसमध्ये संधी मर्यादित राहतात. १९८० नंतरच्या भारतीय राजकारणाने पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा अधिक महत्त्वाची ठरवली आहे आणि पक्षांतर हा यशाचा शॉर्टकट बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT