Tree Falls  
गोवा

Tree Falls | पोकेवाडा-मोरजी सरकारी शाळेच्या छपराची दुरवस्था; झाड कोसळून मोठे नुकसान

Tree Falls | पालकांत तीव्र नाराजी; झाड पडून अर्ध्याहून अधिक छप्पर कोसळले

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पोकेवाडा, मोरजी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीवर मागील महिन्यात मोठे झाड कोसळल्याने छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत इमारतीच्या अर्ध्याहून अधिक छपराची पडझड झाली. त्याची अद्याप दुरुस्ती न झाल्याने शाळेतील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

छपराच्या दुरुस्तीकडे शिक्षण खाते आणि सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालक व स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या शाळेच्या इमारतीवर झाड कोसळल्याची घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, हेच झाड दिवसा कोसळले असते, तर शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता. सुदैवाने रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळल्यामुळे सध्या अंगणवाडीचे विद्यार्थी रंगमंचावर बसून दिवस काढत आहे. लहान मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित आणि योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, त्यांना अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून छपराची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पुढे येत आहे. इमारतीवर झाड कोसळल्यानंतर पेडणे अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, झाड कापण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते झाड रात्रीभर तसेच पडून राहिले होते.

चिमुकल्यांच्या सुरक्षितेशी तडजोड नको!

पोकेवाडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या छपराची तातडीने दुरुस्ती करून अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोली उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आता तरी शिक्षण खाते आणि सरकार या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT