Sudin Dhavalikar 
गोवा

Sudin Dhavalikar | आमदारांची पळवापळवी आधी बंद व्हावी! वीजमंत्री सुदिन ढवळीकर

Sudin Dhavalikar | युवावर्गाने राजकारणात यायलाच हवे. राजकारणात निकोप स्पर्धा असायला हवी. मात्र, आमदारांना पळवण्याचे प्रकार आधी बंद व्हायला हवेत, असे परखड मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील मुलाखतीवेळी दिली.

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

युवावर्गाने राजकारणात यायलाच हवे. राजकारणात निकोप स्पर्धा असायला हवी. मात्र, आमदारांना पळवण्याचे प्रकार आधी बंद व्हायला हवेत, असे परखड मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील मुलाखतीवेळी दिली.

फोंड्यात राजीव गांधी कला मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रमावेळी मंत्री ढवळीकर यांची मुलाखत घेण्यात आली. मंत्री ढवळीकर म्हणाले, आपली मुले शिकून मोठी व्हावीत, या आशेने पालक जिवाचे रान करतात. पूर्वीच्या काळी तशी परिस्थिती नव्हती. गरिबीमुळे शिक्षण घेणे दुरापास्त व्हायचे.

आमच्या कुटुंबातील सदस्यांनी तर माधुकरी मागून शिक्षण घेतले. म्हणूनच कोणी शिक्षणाविना अडू नये, यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे होतकरू गरीब गरजू विद्यार्थ्यांना साहाय्य करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. यात कोणताच भेद केला जात नाही.

ते म्हणाले, शिक्षणाला फार मोठे महत्व आहे. मुळात विद्यार्थ्यांना संस्कारमय शिक्षण देताना ज्येष्ठांचा आदर कसा करावा, विनम्र कसे व्हावे आणि अन्यायविरुद्ध उभे राहण्याचे बाळकडू हे पालक आणि गुरुजनांनी द्यायला हवे.

पालकांनी मुलांवर आपली मते लादता कामा नये. त्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार जगू द्या पण मुलांवर लक्ष हे ठेवायलाच हवे तरच उद्याची सक्षम सुसंस्कारित आणि समर्थ पिढी घडू शकते. बेजबाबदार छंदीफंदी युवा पिढी निर्माण होण्यापासून रोखले पाहिजे, असेही ते म्हणाले. एखादे काम करण्याची जिद्द परिश्रम करण्याची ताकद आणि चिकाटी असेल तर यश आपोआप मिळते.

आम्ही जेव्हा कंत्राट क्षेत्रात उतरलो त्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हते. त्याकाळी ओपा जल प्रकल्पात काम घेतले होते आणि या कामासाठी सायकलला डबे आणि इतर आवश्यक साहित्य लटकवून आम्ही बांदोड्याहून ओपाला जायचो. हे काम पूर्ण केल्यानंतर आम्हाला त्याकाळी पाचशे रुपये फायदा मिळाला.

त्यावेळेला मिळालेले समाधान आणि आनंद फार मोठा होता. त्याकाळच्या पाचशे रुपयांचे मोल आज लाखात आहे. नंतरच्या काळात आम्ही मोठमोठी कामे केली. फातोर्ड्यातील नेहरू स्टेडियम यू पी ब्रीज कॉर्पोरेशन आणि आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण केला त्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, मी स्वतः एक क्रिकेटर आहे. जीसीएमध्ये बारा वर्षे उपाध्यक्ष होतो. शिक्षणाबरोबरच क्रीडा कौशल्यालाही महत्त्व द्यावे.

मडकईतील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के...

मंत्री ढवळीकर म्हणाले, मगो पक्षाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. गावागावात शाळा, विद्यालये सुरू केली. त्यामुळे म्हणूनच आज गोव्यात शंभर टक्के साक्षरता आहे. शिक्षण संस्थांत आधी पुरेशी साधनसुविधा उपलब्ध असायला हवी.

मी स्वतः जर एखादी शिक्षण संस्था काढली असती, तर लगतच्या शिक्षण संस्थांवर गंडांतर आले असते. म्हणून विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. त्यामुळेच मडकईतील बहुतांश विद्यालयांचा निकाल ९८ टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT