पेडणे : पुढारी वृत्तसेवा
तिळारी कालव्याच्या बाजूला बनवलेल्या रस्त्यावरून अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र, जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हणखणे येथील मुख्य तिळारी कालव्याच्या शेजारील रस्त्यावरून बिनधास्त अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. ही अवजड वाहतूक त्वरित रोखावी, अशी मागणी होत आहे.
तिळारी कालव्याची दुरूस्ती आणि देखभाल करण्यासाठी फक्त छोट्या वाहनांची वाहतूक करण्यासाठी या कालव्यावर उभारण्यात आलेल्या पुलावरून खडी क्रशरसाठी लागणाऱ्या काळ्या दगडानी भरलेल्या ट्रकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. तसेच त्या भागात असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाचे सिमेंट काँक्रिटनी भरलेल्या वाहनांची वाहतूकही होते.
बहुतेक वेळा हे ट्रक रात्रीच्या वेळेस वाहतूक करीत असल्याचे दिसून येते. हणखणे येथील पाणी वाटप समितीमार्फत गोपाळ नाईक यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतरही काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कालव्या शेजारील रस्त्यावरून जड वाहतूक सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जलस्रोत खात्यातील सहाय्यक अभियंता अधिकारी उल्हास शेटये यांच्याशी संपर्क साधला असतान हा रस्ता पेडणेतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात आहे. या रस्त्यावर अवजड वाहतूक बंद करणे ही त्यांची जबाबदारी आहे. या संदर्भात बांधकाम खात्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला असून स्मरण पत्रही पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पेडणेतील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून चौकशी केली असता, ही वाहतूक रोखण्यासाठी त्याठिकाणी लोखंडी कमान घालण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, असे सांगितले. दोन्ही अधिकारी कार्यालयीन उत्तरे देत असले तरी ही वाहतूक रोखण्यासाठी जलस्रोत आणि पेडणेतील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी पुढाकार घेत नाहीत, असा स्थानिकांचा आरोप आहे.
तिळारी कालव्याशी संबंधित पाणी वाटप समिती मार्फत लेखी स्वरूपात तक्रार देऊनही आणि कालव्याला तडे जात असताना अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. काही लोकांच्या मते खडी क्रशर मालक व सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प मालक आणि अधिकारी यांच्यात आर्थिक साटेलोटे आहेत.
याबाबतचे फोटो धारगळ येथील जलस्रोत खात्यातील अधीक्षक अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्याकडे हणखणे येथील पाणी वाटप समिती मार्फत देण्यात आले आहेत. जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनी हणखणे भागात जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कालवा तुटावा, यासाठी अधिकारी प्रयत्नशील नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
अवजड वाहतुकीवर कारवाईस टाळाटाळ का?
कालव्यावरून दुचाकी किंवा चारचाकीची वाहतूक करण्यासाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून खडी क्रशरसाठी लागणारे काळ्या दगडांची वाहतूक करणाऱ्या टुकांची मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू आहे. या कालव्याची देखरेख करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या देखत ही वाहतूक सुरू आहे. मात्र, जलस्रोत खात्याचे अधिकारी पेडणेतील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवून मोकळे होतात. राज्यातील जलस्रोत खात्यातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली बाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली असताना अवजड वाहतुकीस रोखण्याबाबत का टाळाटाळ केली जाते. याचा शोध जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.