जतमध्ये इलेक्ट्रिकल्स दुकानात ८ लाखांची चोरी 
गोवा

Pernem Police Quarters | पोलिस स्थानकाच्या निवासी गाळ्यांची दुरवस्था

Pernem Police Quarters | पेडणेत नव्या निवास प्रकल्पाची मागणी; परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे पोलिस स्थानकाच्या मागील बाजूस उभारण्यात आलेले सरकारी निवासी गाळे आज अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्यांची परिस्थिती पाहता ते एखाद्या ओसाड भूत बंगल्याप्रमाणे वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक इमारती मोडकळीस आल्या असून, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या जागेच्या पुनर्विकासाची मागणी जोर धरू लागली आहे.

या निवासी गाळ्यांपैकी केवळ एक-दोन इमारती तुलनेने चांगल्या स्थितीत असून, उर्वरित गाळ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक वर्षांपासून योग्य देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने या इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने या जीर्ण झालेल्या सरकारी गाळ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून मोडकळीस आलेल्या इमारती पाडाव्यात आणि त्या जागी आधुनिक सुविधा असलेले नवीन निवासी गाळे उभारावेत. विशेषतः पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

जर त्या ठिकाणी पोलिस निवासी संकुल उभारणे शक्य नसेल, तर शासनाने या जागेचा उपयोग परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी करावा. माझे घर किंवा तत्सम गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फ्लॅट उपलब्ध करून दिल्यास अनेक कुटुंबांना हक्काचे घर मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिस आणि सर्वसामान्यांना सुरक्षित निवास द्या

पेडणे शहराच्या मध्यवर्ती भागातील ही मौल्यवान सरकारी जागा दुर्लक्षित राहण्याऐवजी तिचा योग्य नियोजनबद्ध विकास व्हावा, परिसराचे सुशोभीकरण व्हावे आणि नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. जीर्ण गाळे हटवा, नवे निवासी संकुल उभारा; पोलिस आणि सर्वसामान्यांना सुरक्षित निवास द्या, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT