पेडणे : पुढारी वृत्तसेवा
अनेक चोरी प्रकरणांत पेडणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन मित्रांचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. या दोघांनीही चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेऊन कपडे, बाईक, कार खरेदी केली आहे. त्यासोबत ऑनलाइन गेमिंगवरही पैसे खर्च केले. त्यामुळे चोरीच्या दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या पतसंस्था आणि बँकांचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पेडणे पोलिसांनी मंगळवारी पेडणे येथील रहिवासी २९ वर्षीय रोहन पडवळ आणि कोलवाळ येथील रहिवासी २० वर्षीय जगन्नाथ उर्फ केतन बागकर यांना अटक केली. आणि त्यांच्याकडून ५३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर चोरीचा माल जप्त केला. उपअधीक्षक (पेडणे) सलीम शेख यांनी सांगितले की, हे दोघे पेडणे तालुक्यातील ११ चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी होते.
चोरी केल्यानंतर दोघेही पतसंस्था आणि राष्ट्रीय बँकांमध्ये जाऊन चोरलेल्या सोन्यावर कर्ज घेत असत. डिसेंबर, २०२४ पासून या दोघांनी पेडणे, धारगळ, विर्नोडा, तुये आणि कोरगाव परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या केल्या. चोरलेले सोने ते पतसंस्थांना देत असत. पतसंस्था चोरलेल्या सोन्यावर त्यांना ७० टक्के मूल्य देत असत.
प्रत्येक वेळी चोरी केल्यानंतर, ते बँकेत आणि पतसंस्थेत जाऊन त्यांच्या कर्जाची रक्कम वाढवून घेत असत, असे उपअधीक्षक शेख यांनी सांगितले. त्यांनी कधीही आधीचे कर्ज फेडले नाही, तरीही पतसंस्था त्यांना नवीन चोरलेल्या सोन्यावर नवीन कर्ज देत होत्या. चोरी केल्यानंतर हे दोघेही चोरीसाठी वापरलेल्या बाईकला रंगकाम करून पूर्वीचा रंग बदलत होते व छोट्या अक्षरांनी लिहिलेल्या बनावट नंबर प्लेट्स वापरत होते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नंबर टिपले जाऊ नयेत म्हणून ते ही खबरदारी घेत होते. बागकर आयटीआयमध्ये शिकत होता तर त्याचा मित्र सुट्टीच्या दिवशी चोरी करण्याचे नियोजन करीत होता. पकडले जाऊ नयेत म्हणून दोघेही कधीही बरोबर चोरी करण्यापूर्वी सर्वेक्षण करायला जात नव्हते, सकाळी १० ते दुपारी १ हा त्यांचा चोरी करण्याचा ठरलेला वेळ होता. एक मित्र घरात आत जायचा तर दुसरा कोणी येतोय का पहायला बाहेर थांबत होता. दोघेही वेगवेगळ्या बाईकने एका ठरलेल्या जागी यायचे व नंतर एका बाईकने चोरी करण्यासाठी जायचे.